Breaking News

राज्य सरकारकडून चवथ्यांदा १२५० कोटींची कर्जरोखे विक्रीला एक हजार आणि २५० कोटींचे कर्जरोखे विक्रीला काढले

मुंबई : प्रतिनिधी

राज्याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली असून यावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तरीही या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य सरकारकडून गेल्या सहा महिन्यात १२५० कोटी रूपयांचे कर्जरोखे पुन्हा एकदा विक्रीस काढले आहेत.

मागील वर्षी ऑगस्ट २०१७ महिन्याच्या कालावधीत राज्य सरकारकडून जवळपास ५ हजार कोटी रूपयांचे कर्जरोखे बाजारात आणण्यात आले होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात ७५० आणि २५० कोटी असे मिळून एक हजार कोटी रूपयांचे कर्जरोखे विक्रीस काढले होते. मात्र त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने हे कर्जरोखे पुन्हा डिसेंबर महिन्यात विक्रीस सरकारकडून काढण्यात आले होते.

मात्र पुन्हा चवथ्यांदा एक हजार कोटींचे १० वर्षासाठी तर २५० कोटींचे ५ वर्षाकरीता असे १ हजार २५० कोटी रूपयांचे कर्जरोखे राज्य सरकारकडून विक्रीस काढण्यात आले आहेत. आगामी काळात आणखी काही कोटी रूपयांचे कर्जरोखे राज्य सरकारकडून विक्रीस काढण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या वित्त विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३४ हजार कोटी रूपयांची तरतूद अद्याप पूर्ण स्वरूपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे या कर्जरोख्यातून जी रक्कम उपलब्ध होईल ती कर्जमाफीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यापूर्वी जो काही निधी उपलब्ध करून दिली तो सर्व निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीत कपात करून तो सर्व कर्जमाफीसाठी वळता करण्यात आल्याचेही वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सद्यपरिस्थितीत राज्य सरकारला नव्याने लगेच कर्ज काढता येणे शक्य नसल्याने कर्जरोखे विक्रीतून पैसे उभे करावे लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कर्जरोख्यांची विक्री रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून करण्यात येणार असून २३ आणि २४ जानेवारी रोजी त्याची विक्री करण्यात येणार आहे.

Check Also

वॉरबर्ग पिंकसने विकत घेतली श्रीराम हाऊसिंग कंपनी ४ हजार ६३० कोटी रूपयांना झाला व्यवहार

न्यूयॉर्क स्थित प्रायव्हेट इक्विटी फर्म वॉरबर्ग पिंकस श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (SHFL) ला इक्विटी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *