Breaking News

पिफमध्ये ‘व्हिडिओ पार्लर’ बालपणाची आठवण जागविणारा चित्रपट

मुंबई : प्रतिनिधी

आपलाही सिनेमा देश-विदेशातील सिनेमहोत्सवांमध्ये दाखवला जावा… आपल्या कामाचंही जाणकारांनी कौतुक करावं… आपल्या सिनेमावरही पारितोषिकांचा वर्षाव व्हावा… असं प्रत्येक दिग्दर्शकाला वाटत असतं. केवळ स्वप्न न पाहता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या दिग्दर्शकांची दखल चित्रपट महोत्सवांमध्ये नेहमीच घेतली जाते. पिफ म्हणजे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ख्याती असलेला महोत्सव आहे. त्यामुळे पिफमध्ये एखादा चित्रपट दाखवला जाणं हे प्रतिष्ठेचं मानलं जातं. ‘व्हिडिओ पार्लर’ या आगामी मराठीला पिफमध्ये समाविष्ट होण्याची संधी लाभली आहे.

‘रंगा पतंगा’ या पहिल्याच चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेले दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांचा दुसरा चित्रपट असलेल्या ‘व्हिडिओ पार्लर’पिफसाठी निवडला गेला आहे. पिफमधील ‘मराठी सिनेमा टुडे’या विभागात हा चित्रपट दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियात प्रदर्शित करण्यात आला आहे. हृदया सिनेक्राफ्टचे डॉ. श्रीयांश कपाले  आणि ओम्स आर्ट्सच्या डॉ. संतोष पोटे यांनी ब्लिंग मोशन पिक्चर्सचे सागर वंजारी यांच्या सहकार्याने ‘व्हिडिओ पार्लर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपट करण्यासाठी विषय शोधत दिग्दर्शक असलेला विक्रम त्याच्या मूळ गावी जातो. तिथं गेल्यानंतर त्याला त्याच्या बालपणीच्या आठवणी जाग्या होतात. व्हिडिओ पार्लरमध्ये तो ज्याच्याबरोबर चित्रपट पहायचा, त्या बालमित्रालाला वीस वर्षांमध्ये भेटलेला नाही. त्याचं यशापयश, प्रेम, अपमान, मित्राचं आयुष्य या सगळ्यातून त्याला मिळालेला चित्रपटासाठी विषय असं या चित्रपटाचं कथासूत्र आहे. संदीप पाठक, ओंकार गोवर्धन, कल्याणी मुळे, गौरी कोंगे, पार्थ भालेराव, रितेश तिवारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन प्रसाद नामजोशी यांनी केलं आहे. सागर वंजारी यांनी संकलन, विजय नारायण गवंडे यांनी संगीत, पीयुष शहा यांनी साऊंड डिझाईन, देवेंद्र गोलतकर यांनी सिनेमॅटोग्राफी, नीलेश गोरक्षे यांनी कला दिग्दर्शन, श्रीकांत देसाई यांनी रंगभूषा केली आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

टायगर आणि कृतीच्या ‘गणपत’ ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरवात प्रदर्शापूर्वी चर्चेत असलेला गणपत चित्रपटाला प्रेक्षकांचा अल्पप्रतिसाद

अभिनेता टायगर श्रॉफ आणि कृती सेनन यांच्या ‘गणपत’ या चित्रपटाची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *