Breaking News

स्थानिक भाजपा आमदारच अनधिकृत बांधकामाला संरक्षण देतोय जिल्हादंडाधिकाऱ्यांनी आदेश देवूनही फौजदारी गुन्हा बिल्डरवर दाखल होईना

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. या रणधुमाळीत सत्ताधारी पक्षाकडून गतीमान सरकार आणि पारदर्शक सरकार पाच वर्षात दिल्याचा दावा करत आहे. मात्र मुंबईपासून हाकेच्या अंतावर असलेल्या मीरा-भाईंदर शहरात अनधिकृत इमारत उभारल्याप्रकरणी ठाणे जिल्हादंडाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश देवूनही केवळ स्थानिक भाजपाच्या आमदाराच्या दबावामुळे फौजदारी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
मीरा-भाईंदर शहरातील जसल पार्क परिसरात ओस्तवाल ऑरनेट बिल्डरने मौजे खारी स.क्र.१५९ ते १६४( जूना) २० ते २५ नविन या जमिनीवर दोन इमारती बांधून त्याची विक्री केली. या इमारतीच्या बांधकामास मीरा-भाईंदर महानगरपालिकेने इमारतीच्या बांधकामास परवानगी दिली.  मात्र या बिल्डरकडून मंजूरी दिलेल्यापेक्षा जास्तीचे बांधकाम केले. तसेच त्या वाढीव बांधकामास जोत्याचा दाखला व इमारत भोगवटा प्रमाणपत्र महापालिकेने दिल्याची खोटी कागदपत्रे तयार करून येथील रहिवाशांची फसवणूक केल्याचा आरोप शिजॉय मॅथ्यु यांनी केला.
याप्रकरणी ठाणे जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे धाव घेतली असता त्यांनी याप्रकरणी मीरा-भाईंदर महापालिकेने ओसवाल ऑरनेट या बिल्डरवर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे स्पष्ट आदेश दिले. त्यासंदर्भात नगरविकास रचना विभागालाही कळविण्यात आले. मात्र हा आदेश देवून दोन महिने झाले तरी पोलिसांकडून अद्याप कोणत्याही स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे मराठी ई-बातम्या.कॉम संकेतस्थळास उपलब्ध झालेल्या कागपत्रावरून दिसत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मदतीसाठी धाव घेतली. मात्र त्यांच्याकडूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
विशेष म्हणजे मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रशासनाकडूनही यासंदर्भात सदर बिल्डरला नोटीस काढण्यात येते. मात्र बिल्डरची माणसे भेटली किंवा स्थानिक भाजपा आमदाराकडून फोन आला की या बिल्डरने उभारलेल्या इमारतीवरील उगारलेला हातोडा पालिकेकडून मागे घेण्यात येत असल्याचा आरोप मॅथ्यु यांनी केला.
तसेच ठाणे पोलिसांवरही सदर भाजपाच्या आमदाराकडून दबाव आणून बिल्डरला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती ठाणे पोलिस आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याने सांगितली.
ही फौजदारी कारवाई टाळण्यासाठी स्थानिक भाजपा आमदारकडून तक्रारदार व्यक्तींवर सातत्याने दबाव आणला जात आहे. तसेच या कामात मीरा-भाईंदरचे पालिका आयुक्तपण या आमदारांच्या सांगण्यानुसार वागत आहेत. तसेच या महापालिकेच्या आयुक्तपदी कोण असतावा कोण नसावा याबाबतही हेच आमदार महोदय ठरवित असल्याची चर्चा मंत्रालयातच सुरु आहे. शहराच्या बकालीकरणास जबाबदार असणाऱ्या या आमदाराच्या विजयासाठी भाजपाचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा आदी प्रचारास जात असल्याने या आमदाराला मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपाच पाठीशी घालत असल्याने भाजपाच्या गतीमान आणि पारदर्शक सरकारवर कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न येथील स्थानिक रहिवाशांकडून विचारण्यात येत आहे.

 

 

Check Also

चला.. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊ या, मतदानासाठी या आहेत सुविधा ….

लोकसभा निवडणूक २०२४ साठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *