Breaking News

रोज चार-पाच उमेदवारांची नावे जाहीर करणार ५ ऑक्टोबरला राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा

मुंबईः प्रतिनिधी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ ऑक्टोबरला आपण पहिली प्रचारसभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी नरेंद्र पाटील पक्षातर्फे निवडणूक लढतील अशी घोषणा करत दरवेळी चार-पाच नावे जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करत आत्महत्या केली होती. नरेंद्र पाटील हे त्यांचे पुत्र आहेत. नरेंद्र पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे नाशिकचे नगरसेवक दिलीप दातीर यांनीदेखील मनसेत प्रवेश केला.
कोहिनूर मिल प्रकरणी ईडीने चौकशी केल्यानंतर राज ठाकरे शांत झाले होते. राज ठाकरेंनी मौन बाळगल्याने विधानसभा निवडणुकीत पक्षाची नेमकी भूमिका काय आहे याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहे. राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनीही राज ठाकरे ईडीच्या चौकशीनंतर शांत झाल्याचं म्हटलं होतं. पण अखेर राज ठाकरेंनी आज मौन सोडलं. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी जागांबाबत आपण योग्यवेळी घोषणा करणार असल्याचं सांगितलं.
पाच तारखेला आपली पहिली प्रचारसभा पार पडणार असून इतके दिवस जे बोललो नाही ते आता बोलणार आहोत असंही त्यांनी यावेळी म्हटलं. अशाच पद्धतीने रोज चार-पाच नावं जाहीर करेन असं मिश्किल भाष्यही यावेळी त्यांनी केलं.
दरम्यान यावेळी राज ठाकरे यांनी पहिल्या प्रचारसभेची जागा अद्याप ठरली नसल्याचं सांगताना लवकरच कळवू असे सांगत प्रचार सुरु झाल्यावर जे काही सांगायचं ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगेन असंही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेनेच्या विरोधात प्रचार केला होता. खासकरुन मोदी आणि अमित शाह यांना हटवा अशी भूमिका घेतली होती. त्यांचं ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे वाक्यही चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. मनसे १०० जागा लढवणार अशी माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. मात्र त्याबाबत राज ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *