Breaking News

देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण, त्यांना कायदेविषयक अंमलबजावणीचे काम नाही… उपसभापती अॅड नीलम गोऱ्हे यानी निवेदन करण्याचे दिले होते आदेश

मुंबईसह राज्यात कंत्राटी पध्दतीने पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त एका वर्तमानपत्राने दिले. त्यामुळे सत्ताधारी महायुती आणि भाजपाचे नेते तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. या निर्णयाचे पडसाद सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत उपसभापती अॅड नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या निवेदनाच्या निर्देशानुसार राज्यातील कंत्राटी पोलिस भरतीबाबत भूमिका स्पष्ट केली.

सरकारने यावर निवेदन करण्याचे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. या निर्देशानुसार, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन देऊन ही भरती कंत्राटी पद्धतीने नसून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातून भरती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातून भरण्यात येणाऱ्या या तीन हजार कर्मचाऱ्यांना केवळ सुरक्षाविषयक कामकाज, गार्डविषयक कर्तव्याची कामे देण्यात येणार असून कायदेविषयक अमंलबजावणीचे काम देण्यात येणार नाही.

२४ जुलै २०२३ च्या निर्णयान्वये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातून उपलब्ध करून देण्यात आलेले पोलीस हे नियमित पोलीस शिपाई पदावर कर्तव्यावर उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्या सेवा संपुष्टात येणार आहेत. (म्हणजेच ११ महिन्यांनी किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत तात्पुरत्या पोलिसांची सेवा संपुष्टात येईल. ) राज्य सरकारच्याच महामंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या जवानांना शासकीय कार्यालये, व्यावसायिक प्रतिष्ठाने, सार्वजनिक ठिकाणी इत्यादी करता यापूर्वीही सुरक्षा नियमित केली आहेत आणि वापरली जात आहेत. त्यामुळे ही भरती कंत्राटीपद्धतीने घेतली जात नाहीत, यावर देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडताना अधिक जोर दिला.

राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ तयार केलं होतं. या महामंडळातून ज्यांना नियुक्त केलं जातं, त्यांना विमानतळे, इतर आस्थापनांवर गार्डिंगची कर्तव्य दिली जातात. गेली तीन वर्षे पोलीस भरती न झाल्याने मुंबई पोलिसांची मोठी तूट झाली आहे. एकावेळी अनेक भरती करता येत नाही, कारण तेवढी ट्रेनिंग सुविधा नाही. पण १८ हजारांची करतो आहे. भरती पूर्ण झाली असून ते आता ट्रेनिंगला जाणार आहेत. मुंबईसारख्या शहरांत १० हजार पोलिसांची तूट ठेवून शहर सुरक्षित ठेवता येत नाही. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने नाही तर या महामंडळातून जसे इतर आस्थापनांना पोलीस दिले जातात, तसेच मुंबई पोलिसांना दिले जाणार आहेत. कुठेही यात कंत्राटी पद्धतीचा वापर केला जाणार नाही. तो करण्याचा विचारही नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *