Breaking News

शरद पवारांच्या उपस्थितीत अजित पवार यांची मागणी, मला मुक्त करा…

गेल्या महिन्यात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याच जाहीर केलं. त्यानंतर कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्याचवेळी पक्षातील नेत्यांकडे अधिक आणि मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जातील असं त्यांनी जाहीर केलं. त्यानुसार गेल्या आठवड्यात शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नेमणूक केली. त्यानंतर आज २१ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात पक्षातील वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केले. मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा. त्याऐवजी मला पक्ष संघटनेत हवी ती जबाबदारी द्या अशी मागणी अजित पवार यांनी पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांसमोर केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार म्हणाले, मी इतकी वर्ष या संघटनेत सगळीकडे काम करतोय. मला मंचावरील मान्यवरांना सांगायच आहे की, मला विरोधी पक्षनेतेपदात फार काही रस नव्हता. परंतु आमदारांनी आग्रह केला, त्यांनी सह्या केल्या, त्यांच्या आग्रहाखातर मी हे पद स्वीकारलं. तसेच नेते मंडळींनी पण सांगितलं अजित तू त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता हो. त्यामुळे मी एक वर्ष झालं या पदावर काम करतोय.

अजित पवार म्हणाले, एक वर्ष झालं मी विरोधी पक्षनेते पद सांभाळलं. ते सांभाळत असताना आता काहींचं म्हणणं आहे की, मी कडक वागत नाही. आता मी काय त्यांची गचुरी धरू का काय करू? कडक वागत नाही म्हणजे काय ते कळत नाही. त्यामुळे आता बास झालं. मला आता त्या पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा आणि संघटनेची एखादी जबाबदारी द्या. मग कशा पद्धतीने पक्ष चालतोय बघा. अर्थात हा अधिकार नेते मंडळींचा आहे. परंतु माझी तशी इच्छा आहे.

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, सत्तापिपासून भाजपा मृतदेहावरून रॅली काढतंय काय?

मुंबईमध्ये होर्डींग दुर्घटना घडली आहे. भ्रष्ट महायुतीमुळे या दुर्घटनेत १८ जणांना जीव गमवावा लागला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *