Breaking News

भाजपाचा सवाल, शाईफेकीला समर्थन हेच राष्ट्रवादीचे मुख्य धोरण आहे का ? भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल

सत्ता गेल्याचे वैफल्य आणि शिंदे-फडणवीस सरकारचा विकास कामांचा झपाटा यामुळे आलेल्या नैराश्यातून व विरोधाचे ठोस मुद्दे हाती नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने खालच्या दर्जाचे राजकारण सुरू केले असून शाईफेकीसारखे हीन प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केले आहेत. कायदा हाती घेऊन शाईफेकीला समर्थन हेच राष्ट्रवादीचे धोरण आहे का, याचा खुलासा राष्ट्रवादीचे राज्यातील नेते शरद पवारांच्या वाढदिवसादिनी करतील का, असा सवाल प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी प्रदेश भाजपाच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत केला. प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण याप्रसंगी उपस्थित होते.

शिंदे-फडणवीस सरकारविरुद्ध बोलण्यासाठी मुद्दे नसल्यानेच राज्यात कायदा-सुव्यवस्था स्थिती बिघडविण्याचा प्रयत्न होत असून ‘मविआ’तील काहींची याला फूस आहे. राज्याचे मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्याच्या प्रकार हा या प्रयत्नाचा भाग आहे असा आरोपही उपाध्ये यांनी केला. कायदा हातात घेतल्याचा तीव्र निषेध करण्याऐवजी शाईफेक करणाऱ्यास बक्षीस देण्याचे बारामतीतील राष्ट्रवादीच्या नेत्याने जाहीर केले आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही शाईफेकीचे अप्रत्यक्ष समर्थनच केले आहे, असेही उपाध्ये यांनी निदर्शनास आणले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्ला करणा-या माथेफिरूचा भाजपाने तीव्र निषेध केला होता. कायदा हातात घेऊन गुंडगिरी करणाऱ्या कोणाचेही भाजपाने कधीच समर्थन केले नव्हते, उलट अशा घटनांचा कायम तीव्र धिक्कार केला होता, याकडे केशव उपाध्ये यांनी लक्ष वेधले.

उपाध्ये म्हणाले की, आता मात्र, विचारांची लढाई विचाराने न लढता सत्ताभ्रष्ट झाल्याने सैरभैर झालेल्या नेत्यांकडून गुंडगिरी आणि दहशतवाद माजविणाऱ्या माथेफिरुंचे कौतुक केले जात आहे. वैचारिक भूमिका वेगळ्या असू शकतात मात्र अशा पद्धतीने कायदा हाती घेणे हे असमर्थनीय आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्या नेत्यावर शाई फेकणे ही तालीबानी प्रवृत्ती आहे, याला राष्ट्रवादीचे समर्थन आहे का हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी स्पष्ट करावे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *