Breaking News

ईडीच्या समन्सनंतर संजय राऊत यांचे आव्हान, मला अटक करा बंडखोरानंतर आता राऊत टार्गेट

राज्यात सत्ता परिवर्तनाच्या उद्देशाने शिवसेनेत एकप्रकारे फूट पाडण्याच्या अनुषंगाने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुळ शिवसेनेतील ३९ आमदार आणि महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना घेवून गुवाहाटी येथे तळ ठोकल्याने राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले. तसेच राऊत यांना उद्या चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले. ईडी समन्सची माहिती मिळताच संजय राऊत यांनी ट्विट करत ईडीलाच आव्हान देत ‘या मला अटक करा’ असे खुले आव्हान दिले. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी हे ट्वीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले.

ईडी समन्सनंतर संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत म्हणाले की, मला आताचा समजले की ईडीने मला समन्स पाठवले आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या… मला अटक करा ! जय महाराष्ट्र!.

संजय राऊत यांना ईडी समन्स
शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या गटासह केलेल्या बंडामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आणि राज्यात सत्तासंघर्षाची ठिणगी पेटली. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावले आहे. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. उद्या ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याचे संजय राऊतांना आदेश दिले. दरम्यान, यासंदर्भातील कोणतीही नोटीस ईडीकडून अद्याप मिळालेली नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

कथित पत्राचाळ घोटाळा काय आहे
पत्राचाळ जमीन घोटाळा १,०३४ कोटी रुपयांचा आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे ३ हजार फ्लॅट बांधकाम करायचे काम दिले होते, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *