Breaking News

विधान परिषदेचे माजी सभापती ना.स.फरांदे यांचे निधन अभ्यासू नेतृत्व गेल्याची राजकिय पक्षांमध्ये भावना

मुंबईः प्रतिनिधी

राज्याच्या विधान परिषदेचे सभापती ना.स फरांदे यांचे आज सकाळी निधन झाले. तीन-चार दिवसांपूर्वी पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयात उपचार होते. या उपचारा दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे.

फरांदे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझर्डे गावचे. मात्र त्यांचे शिक्षण सोलापूरात झाले. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूरचे सुपुत्र सुशिलकुमार शिंदे हे त्यांचे वर्गमित्र आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघातून ते दोनवेळा विधान परिषदेवर निवडूण आले होते. तसेच १९९८ ते २००१ या कालावधीत विधान परिषदेचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहीले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली.

त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यासह काही राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया

विधान परिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्या निधनाने राजकीय-सामाजिक क्षेत्रातील एक निरलस, निष्कलंक आणि ध्येयवादी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. प्रा. फरांदे हे एक ध्येयवादी अध्यापक, चिंतनशील अभ्यासक, अभ्यासू वक्ते आणि चौफेर प्रतिभेचे साहित्यिक होते. सामाजिक बांधिलकीपोटी ते राजकारणात सक्रीय झाल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधान परिषदेचे माजी सभापती प्रा.ना.स.फरांदे यांच्या निधनाने एक अभ्यासू व सुसंस्कृत नेतृत्व गमावले असल्याची भावना व्यक्त करत त्यांचा संत साहित्याचा गाढा अभ्यास होता व त्यांना वक्तृत्वाची देणगी लाभली होती. शांत व संयमी स्वभाव तसेच कार्यकर्त्यांमधील नेता हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याची प्रतिक्रिया देत भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब पाटील-दानवे व्यक्त केली.

विधानपरिषदेचे माजी सभापती प्रा. ना. स. फरांदे यांच्या निधनामुळे अभ्यासू, अनुभवी व संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. अध्यापनाचे कार्य करत असतानाच फरांदे यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला. राज्याचा चौफेर अभ्यास, विषयाची मुद्देसूद मांडणी करण्याचे त्यांचे विशेष कौशल्य होते. विधानपरिषदेचे आमदार म्हणून अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली. विधानपरिषदेचे उपसभापती आणि सभापती म्हणून काम करताना त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतला संवाद कायम ठेवला अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *