Breaking News

थंडीचा कडाका वाढणार.. बर्फवृष्टी आणि पश्चिमी चक्रवाताचा परिणाम

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे महाराष्ट्राच्या तापमानात घट होऊन सर्वत्र थंडी अवतरली आहे. हिमालयीन विभागात पुन्हा बर्फवष्टी होणार असल्याने संक्रांतीपर्यंत रात्रीच्या किमान तापमानात आणखी घट होऊन थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर-पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील रात्रीच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट कायम असल्याने या भागात थंडीचा कडाका आहे. मुंबईसह कोकण आणि किनारपट्टीच्या भागातही तापमानात घट होऊन गारवा निर्माण झाला आहे.

एकापाठोपाठ निर्माण होणाऱ्या पश्चिमी चक्रवाताचा परिणाम म्हणून हिमालयीन विभागातील बर्फवृष्टी आणि उत्तरेकडील राज्यांतून महाराष्ट्राकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात मोठी घट झाली. ९ आणि १० जानेवारीला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागांत थंडीच्या लाटेची स्थिती होती. गोंदिया, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आदी भागांत ५ ते ६ अंश हंगामातील नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली.सध्या तापमानात किंचित वाढ झाली असली, तरी सर्व ठिकाणी तापमान सरासरीखालीच आहे. त्यामुळे गारवा कायम आहे. थंड वाऱ्यांच्याप्रवाहांमुळे सध्या कर्नाटकातही थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा पश्चिमी चक्रवाताचा परिणाम दिसणार आहे. जम्मू-काश्मीर, लडाख हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी भागांत १२ आणि १३ जानेवारीला बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशात पावसाळी स्थिती तयार होणार आहे. त्यानंतर १६ आणि १७ जानेवारीला उत्तर राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंडीगड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आदी भागांत थंडीच्या लाटेची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होईल. संक्रांतीपर्यंत तापमानात घट कायम राहील. त्यानंतर काही प्रमाणात तापमानात चढ-उतार होतील. उत्तरेकडे थंडीची लाट आल्यानंतर पुन्हा तापमानात काही प्रमाणात घट होईल.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात चार-पाच दिवसांपासून घट कायम आहे. मात्र, मुंबई आणि कोकण किनारपट्टीचे तापमान सरासरीपुढेच होते. त्यामुळे या भागात फारसा गारवा नव्हता. मात्र, सध्या कोकणातील पारा सरासरीच्या तुलनेत ३ ते ४ अंशांनी घटला आहे. रत्नागिरीत १५.६ अंश किमान तापमानाची नोंद झाली. मुंबई परिसरातही तापमान किंचित सरासरीखाली आल्याने रात्री हलका गारवा जाणवतो आहे. गुरुवारी जळगाव येथे राज्यातील नीचांकी ७.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ पुणे ८.३, नाशिक ९.२, औरंगाबाद ९.४ अंश तापमान नोंदविले गेले. सातारा, उस्मानाबाद, नागपूर, अमरावती, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आदी भागांत १० ते ११, तर सांगली, परभणी, नांदेड, अकोला, ब्रह्मपुरी, वाशिम आदी भागांत १२ ते १३ अंशांखाली तापमान आहे.

Check Also

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *