Breaking News

उद्धव ठाकरे यांची टीका, न्यायालयाच्या आदेशानुसार लवाद नव्हे तर लबाडाने…

मागील दिड वर्षापासून आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर शिवसेना कोणाची आणि कोणी शिवसेना खरी याविषयीचा निर्णय देण्याचे अधिकार न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला. त्यावरून सर्वचस्तरातून टीकेला सुरुवात झाली. दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल कायद्याच्या कसोटी बाहेरचा असल्याचा आरोप करत शिवसेना उबाठा गटाने सप्रमाणपत्र सिध्द करण्याचा करत राहुल नार्वेकर यांच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यावेळी अनिल परब यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख निवडीच्या अनुषंगाने पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या घेण्यात आलेल्या निवडीची माहिती यापूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केली असल्याचे सांगत त्यावेळच्या कार्यकारणीच्या निवडी प्रसंगी विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे त्यावेळी उपस्थित होते असा दावाही एका व्हिडीओ दाखवित केला.

यावेळी अनिल परब म्हणाले की, शिवसेना उबाठा गटाने वेळोवेळी केलेल्या बदलाची माहिती केंद्रीय निव़डणूक आयोगाकडे सादर केल्याचे सांगत त्याविषयीची पोहोच मिळालेली काही कागदपत्रेही उपस्थित शिवसैनिकांना दाखवित आणि काही व्हिडिओही सादर केले. इतकं सगळं करून जर केंद्रीय निवडणूक आयोग म्हणतं असेल की २०१३ नंतर उद्धव ठाकरे गटाने कोणतीच कागदपत्रे सादर केली नाहीत मग केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे त्यांच्याकडे पोहोचली कशी असा सवाल करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उभे करत या सगळ्या कागदपत्रांच्या आधारेच सर्वोच्च न्यायालयाने जो मार्गदर्शक निकाल दिल्याचेही सांगितले.

आपल्या अध्यक्षीय भाषणा दरम्यान उद्धव ठाकरे म्हणाले की,
शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कोण हे ठरवण्यासाठी हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं होतं. पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यासाठी ठाकरे गटाकडून तब्बल दोन ट्रक भरून ११ लाख प्रतिज्ञापत्र आयोगासमोर सादर केली होती. या प्रतिज्ञापत्राचं काय केलंत असा सवाल करत निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असा घाणाघात केला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, माझं राहुल नार्वेकरांना आव्हान आहे की नार्वेकरांनी आणि मिंध्यांनी पोलीस संरक्षणाशिवाय यावं. मी ही तिथे सुरक्षेविना येईन. तिथंच तिथे नार्वेकरांनी सांगावं की शिवसेना कोणाची? मग जनतेचे ठरवावं की कोणाला पुरावा आणि कोणाला गाडावा. शिवसेना त्यांना विकली असेल तर ती काही विकावू वस्तू नाही. आज तर माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. लाखो जनता, शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जवळपास १९ लाख ४१ हजार प्रतिज्ञापत्र लिहिले होते. या प्रतिज्ञापत्राच्या गाद्या करून निवडणूक आयोग त्यावर झोपलं आहे का? एकतर हे प्रतिज्ञापत्र स्वीकारा. नाहीतर आमचे पैसे आम्हाला परत द्या. हा मोठा घोटाळा आहे. निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे. येथे शिवसैनिकांचे पैसे गेले आहेत. येथे कोणी दोन नंबरचे पैसे कमावणारे कोणी नाही. ईडीसुद्धा त्यांचाच नोकर आहे असा आरोपही केला.

व्हीपचा मराठी अर्थ चाबूक आहे. चाबूक आमच्या हातात शोभून दिसतो लाचारांच्या हातात नाही. जी काही थट्टा चाललेली आहे ती आज तुम्ही पाहिली अशी टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, “गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री मेल्याशिवाय आता मढ्याला उपाव नाही” अशी सुरेश भटांची कविता आहे. राहुल नार्वेकर यांनी तसाच निर्णय घेतला आहे. गारद्यांच्या गर्दीत हे सामील झाले आहेत. ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री जन्माला आले. घटना लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले त्याच मातीत ही अवदसा जन्माला आली आहे. लोकशाहीचे हत्यारे जन्म घेत आहेत आणि त्यांना महाशक्ती साथ देते आहे. त्यांना माहीत नाही ही महाराष्ट्राची माती अशांना गाडून टाकते आणि संपवून टाकते असा इशाराही दिला.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण

मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण दिले आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *