शिवसेना (ठाकरे गट) युवा सेनेच्या नेत्या रोशनी शिंदे यांना सोमवारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने आज ठाण्यात जनक्षोभ मोर्चा काढण्यात आला. तीनही पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात एकत्र जमले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत सरकारचा निषेध केला. या वेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार करीत असताना त्यांची मिमिक्रीदेखील केली. या मिमिक्रीमुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये एकच हंशा पिकला. या वेळी उपस्थितांनी वन्स मोअरचे नारे देत, पुन्हा एकदा मिमिक्री करण्याची विनंती केली.
आदित्य ठाकरे पुढे टीका करताना म्हणाले, आमच्या मोर्चाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून १७ अटी घालण्यात आलेल्या आहेत. आता महाराष्ट्रात मोर्चा काढायचा नाही, भाषण करायचे नाही का? गद्दार लोकांच्या टोळीने रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्याविरोधात तक्रार करण्यासाठी आमचे नेते पोलिस आयुक्तांकडे गेले असता पोलीस आयुक्त कार्यालयाला टाळे लावून पळाले. फेसबुकवर फक्त एक पोस्ट टाकली म्हणून तुम्ही महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करता. पोलीस मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करीत नाहीत, आयुक्त कार्यालयात थांबत नाहीत, कारण ते ‘वर्षा’वर जाऊन मुख्यमंत्र्यांचे आदेश घेत आहेत. आज अधिकारी जागेवर नाहीत, महाराष्ट्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर गुजरात, गुवाहाटीचे मुख्यमंत्री बसले आहेत असा उपरोधिक टोलाही मुख्यमंत्री शिंदेंना लगावला.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, हे गद्दारांचे सरकार काही वर्षांचे, काही महिन्यांचे नसून काही तासांचे आहे. सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला जे कुणी आयएएस, आयपीएस अधिकारी मदत करत आहेत. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. जे लोक सरकारचे चिलटे म्हणून काम करीत आहेत, त्यांना आमची सत्ता आल्यानंतर तुरुंगात टाकले जाईल. ‘जेल भरो’ आंदोलन करण्याचा कार्यक्रम आम्ही राबवू. हाच निश्चय करण्यासाठी आज आम्ही आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर आलो आहोत असे सांगितले.
या वेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री केली. ते म्हणाले, शर्ट खालती-वरती करीत, वर-खाली बघून दाढी खाजवत ते महिलांबद्दल अभद्र भाषा बोलतात. या वेळी आदित्य ठाकरे यांच्या हावभावावरून उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला. अनेकांनी वन्स मोअरचे नारे दिले. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, वन्स मोअर नाही, असे लोक ‘ओनली वन्स’ होतात, त्यांना परत येऊ द्यायचे नाही.
महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर आहे, याबाबत माहिती देताना आदित्य ठाकरेंनी एक किस्सा सांगितला. भाजपा कार्यकर्त्याला शिंदे गटाच्या ५५ लोकांनी मारहाण केली, मात्र संबंधित लोकांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा मुद्दा आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत चालले आहेत. पण मुख्यमंत्री गप्प आहेत. राज्यात काय चाललंय? हे मुख्यमंत्र्यांना माहीतच नाही. मुख्यमंत्री दुसरीकडे बघतात आणि अत्याचार करणाऱ्यांच्या पाठीत कौतुकाची थाप मारतात. दहिसरमध्ये एका कार्यकर्त्याने गद्दार गँगमधून सवयीप्रमाणे भाजपात पलटी मारली. ते आधी शिवसेनेत होते, मग गद्दार गँगमध्ये गेले. आधी कुठून आले होते, ते माहीत नाही. पण ते गद्दार गँगमधून भाजपात गेले. भाजपा हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपामध्ये प्रवेश केला की सगळे सुरक्षित होतात, हेच आपल्याला आतापर्यंत माहीत होतं. घरी कुणीच येणार नाही. पोलीस, आयटी, ईडी, सीबीआय असं कुणीच घरी येणार नाही, असं त्यांचेच नेते बोलतात असा उपरोधिक टोलाही लगावला.
त्यामुळे दहिसरमधल्या या बिचाऱ्या कार्यकर्त्यालाही हेच वाटलं. आपण शंभर गुन्हे केले आहेत. एवढी पापं केली आहेत. त्यामुळे त्यानेही भाजपात प्रवेश केला. पण हा कार्यकर्ता भाजपात गेल्यानंतर गद्दार गँगच्या ५५ लोकांनी या माणसाला धू धू धुतला. स्वत: ला धुवायला हा वॉशिंग मशिनमध्ये (भाजपा) गेला. पण गद्दार गँगच्या लोकांनी त्याला धुवून काढला, असा किस्साही आदित्य ठाकरेंनी सांगितला.
दुसऱ्या दिवशी सभागृहात या भाजपा कार्यकर्त्याचा आवाज भाजपाने नव्हे तर अनिल परब, अंबादास दानवे आणि जितेंद्र आव्हाडांनी उचलला. कारण तो कार्यकर्ता कुणाचाही असला तरी महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती एवढी घाणेरडी कधीही झाली नव्हती. राज्यात एवढं गलिच्छ राजकारण आपण कधीही बघितलं नव्हतं. राजकीय कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात जातोय, म्हणून कधीही मारामाऱ्या झाल्या नाहीत. आश्चर्याची बाब म्हणजे, भाजपात जाऊनही मारामारी झाली. भाजपाच्या कार्यकर्त्याने मार खाल्ला, तरीही ५५ लोकांवर अद्याप एफआयआर दाखल झाली नाही. महाशक्तीने त्यांना माफ केलं की काय? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.