महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांना नव्याने पीककर्ज द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज लोकसभेत केली.
आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकसभेत मांडल्या. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून त्यांना केंद्राने तात्काळ मदत करण्याची गरज आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असून, जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, मराठा आरक्षण, अतिवृष्टी, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, शेतकर्यांची कर्जमाफी यांसारख्या अनेक समस्या महाराष्ट्राला भेडसावत आहेत. या मुद्द्यांवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा होण्याची गरज आहे. याबाबतचे मुद्दे अधिवेशनात मांडले जाऊन त्याच्यावर योग्य तोडगा निघणेही अत्यंत गरजेचे आहे. यातील शेतकर्यांची कर्जमाफी हा राज्यातील ज्वलंत प्रश्न असून असल्याचे सांगितले.
लोकसभेत शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्र आणि माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. काही जिल्ह्यात गारांचा पाऊस झाल्याने, ओला दुष्काळ पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी यंदा पाऊसच झाला नसल्याने अशा ठिकाणी कोरडा दुष्काळ पडला आहे. वातावरण बदलामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. द्राक्ष, कांदा, केळी, गहू, धान, कापूस, सोयाबीनसह पाल्याभाज्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्यांची चिंता वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रामधील नाशिक, बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आल्याची बाबही त्यांनी लोकसभा सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.
राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात कुठे ओला दुष्काळ, तर कोठे कोरडा दुष्काळ असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे दुधाला भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी संकटात आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाने तात्काळ महाराष्ट्रात जाऊन पाहणी करावी अशी मागणी करत महाराष्ट्राला केंद्राने मदत करावी. तसेच कष्ट करणार्या महाराष्ट्रातील शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी. तसेच त्यांना नवीन कर्ज देखील देण्यात यावे, अशी थेट मागणीही केली.
लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान महाराष्ट्रातील दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दुष्काळामुळे भीषण स्थिती आहे. शेतकरी निसर्गाच्या संकटांमुळे अडचणीत आहे. दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांच्या… pic.twitter.com/R7E4V7TcfX
— Supriya Sule (@supriya_sule) December 4, 2023
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तर, महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे बँकेतून त्यांना कर्ज दिले पाहिजे. सोबतच हवामान बदलाचा देखील त्यांना फटका बसत असून, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. आपल्यावर जेव्हा संकट येते, त्यावेळी शेतकरी मदतीला धावून येत असतो. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकर्यांचे कर्ज माफ करून नवीन कर्ज देण्याचे आदेश बँकांना द्यावे अशी मागणीही केली.