Breaking News

शरद पवार यांचे अध्यक्षांच्या निकालावर पहिल्यांदाच भाष्य, पदाचा गैरवापर…

आमच्याकडून कोणतेही भावनिक आवाहन करण्यात येणार नाही. बारामती मतदारसंघात वर्षीनुवर्षे लोक आम्हाला ओळखतात. त्यामुळे आम्हाला काही भावनिक आवाहन करण्याची गरज वाटत नाही. परंतु, विरोधकांची भाषण करण्याची पद्धत काहीतरी वेगळंच सुचवत आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

शरद पवार म्हणाले की, पक्ष संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून असा निर्णय होईल अशी खात्री होती. विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्या पदाची प्रतिष्ठा ठेवली नाही आणि ती ठेवतील असही वाटत नव्हतं. दोन्ही बाजूंची पात्रता अशा प्रकारचा निर्णय त्यांनी आधी देखील घेतला होता. शिवसेनेबाबत जो निर्णय घेतला होता त्याच निर्णयाची पुनरावृत्ती केली. पक्ष आणि चिन्ह या दोन्हींची भूमिका निवडणूक आयोग आणि अध्यक्षांनी घेतली. आमच्या मते आम्हा लोकांना न्याय मिळाला नाही. यात पदाचा गैरवापर कसा होतो हे यातून दिसून आले. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो आहोत. विधानसभा अध्यक्षांचा निकाल आम्हा लोकांना न्याय देणारा नाहीच आहे, पण पदाचा गैरवापर कसा होतो याचे उदाहरण देशासमोर देण्यासंबंधीचा हा निर्णय आहे. आणि त्याला पर्याय आम्ही सुप्रीम कोर्टात हे प्रकरण दाखल केलेले आहे. आमची सुप्रीम कोर्टाला विनंती असणार आहे की, निवडणुका जवळ आल्या असल्याने लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणीही करणार असल्याचे यावेळी माहिती दिली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, पक्षातून लोक सोडून जातात, नवे येतात. या गोष्टी घडत असतात, मात्र असं कधी घडलेलं नाही की ज्याने पक्ष स्थापन केला त्याचा पक्षच काढून दुसऱ्याला दिला. नुसता पक्षच दिला नाही तर चिन्ह ही देऊन टाकलं. ठीक आहे, हा निर्णय कायद्याला धरुन आहे असं वाटत नाही. त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याचा निकाल नीट लागेल अशी अपेक्षा आहे. दुसरं एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो चिन्ह गेलं तरीही त्याची चिंता करायची नसते. मी आत्तापर्यंत १४ निवडणुका लढलो त्यातल्या पाच निवडणुकांमध्ये चिन्हं वेगवेगळी होती. पहिल्यांदा बैलजोडी होती, नंतर गाय-वासरु आलं, त्यानंतर चरखा हे चिन्ह आलं, त्यानंतर हाताचं चिन्ह आलं. त्यानंतर घड्याळ आलं. वेगळी चिन्हं आपण पाहिली आहेत. त्यामुळे कुणाला असं वाटत असेल की चिन्ह काढून घेतलं म्हणजे त्या संघटनेचं अस्तित्व संपेल तर असं घडत नसतं. सामान्य माणसांशी संपर्क वाढवला पाहिजे. त्यांना नवं चिन्ह काय आहे ते पोहचवलं पाहिजे इतकंच महत्त्वाचं असतं असेही सांगितले.

Check Also

फारूख अब्दुल्ला म्हणाले, पीओके बाबत राजनाथ सिंह यांना कोणी अडवलेय…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तान ऑक्युपायड जम्मू काश्मीर अर्थात पीओके …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *