Breaking News

शरद पवार यांची भीती, कंत्राटी नोकरीत महिलांना संधीच मिळणार नाही महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार यांचे प्रतिपादन

महिला धोरण, आरक्षण या विषयांवरील चर्चा आज येथे झाली. कर्तुत्वाचा वाटा फक्त पुरुषांकडे असतो हे चुकीचे असून तुम्ही स्त्रियांनी देखील आज दाखवून दिले की, तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही कर्तुत्ववान स्त्री नक्कीच बनू शकता. ‘प्रॉपर्टीत अधिकार’ याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झालेली नाही असे मला वाटते. माझ्याकडे सत्ता असताना आम्ही एक निर्णय घेतला की, शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये सातबाराचा उतारा जो असतो त्यात दोघं पती-पत्नीचे नाव असलं पाहिजे. हा निर्णय काही ठिकाणी राबवला गेला. परंतु, १००% राबवले गेले असे दिसत नाही. तर आता हे कार्यक्रम आपल्याला हातामध्ये घेऊन सरकार दरबारी आग्रह धरावा लागेल. माझ्याकडे संरक्षण खाते होते तेव्हा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या प्रमुखांचा अतिशय विरोध असताना देखील संरक्षण खात्यात मुलींना आरक्षण दिले गेले. आणि आज आपण पाहतो २६ जानेवारीला दिल्लीची परेड ही मुलीच करत असतात असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित महिला कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित राहून सर्व उपस्थित महिला-भगिनींना मार्गदर्शन केले.

शरद पवार म्हणाले, मणिपूर सारखी स्थिती आज आपण सर्वांनीच पाहिलेली आहे, जेथे महिलांची धिंड काढली जाते, व्यक्तिगत हल्ले केले जातात, जिवंत मारले जाते आणि हे सर्व भारतात होतं याबद्दलची आपली भूमिका अतिशय जागृकतेने आपण प्रत्येकाने मांडायला हवी. असा काही प्रकार घडला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या भागातल्या भगिनी या रस्त्यावर उतरल्याच पाहिजे आणि त्यासाठी आग्रह हा धरलाच पाहिजे. ऱ्हास्त प्रश्नांसाठी रस्त्यावर येणे हा आपला हक्क आहे आणि त्याबाबत भूमिकाही आपण घेतलीच पाहिजे असेही सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, समायोजन करण्यासाठी काही वर्ग, शाळा बंद करायचे असे राज्य शासनाकडून सांगण्यात येत आहे. आपण महाराष्ट्रात आहोत. सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा विरोध असताना देखील पहिली शाळा काढली. आणि आत्ता महाराष्ट्रात शाळा बंद करणे, मुलांना शाळेच्या बाहेर काढणं हे सर्व सुरू असताना महाराष्ट्रातल्या सावित्रीच्या लेकी अशा गप्प बसणे याचा जाब लोक आपल्याला विचारतील आणि म्हणूनच माझा आग्रह आहे की, तुमच्या परिसरात प्राथमिक शिक्षणातून मुलांना बाजूला ठेवण्याचा जो काही डाव चाललेला आहे तो आज थांबवून आपण त्याबद्दलची काळजी घ्यायला हवी असे आवाहनही केले.

बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलताना शरद पवार म्हणाले, आज सरकारी नोकऱ्यांची कमतरता आहे. सरकारी नोकऱ्यांची कमतरता एका बाजूला आणि रिक्त जागांचा प्रश्न मोठा आहे. महाराष्ट्रात १३८ प्रवर्गांच्या नोकऱ्यांची भरती करायची, परंतु सरकारचे मत असे आहे की, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती करू. सरकारी नोकरी मिळते आणि काही दिवसांनंतर ती कायम होते आणि आयुष्यभर काम करायची ती संधी मिळते, कुटुंबात एक प्रकारचे स्वास्थ्य असतं. परंतु त्या उलट कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकरी मिळाली तर ती फक्त एका ठराविक काळापूर्तीच असते. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या नोकरीत आरक्षण नाही. या सर्व गोष्टींमुळे सर्वसामान्य लोक आपल्या मूलभूत अधिकांरापासून वंचित होतात. आणि मला खात्री आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या नोकरीत महिलांना संधीच मिळणार नाही आणि त्यामुळे आपण सर्वांनी एकत्रित येऊन यासंदर्भातला विरोध करणारा कार्यक्रम घेवून सरकारला जागे करायला हवे असेही सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या पावसाळी विधानसभेत अनिल देशमुख यांनी एक प्रश्न विचारला होता तो असा की, १ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२३ या ५ महिन्याच्या काळात महाराष्ट्रात किती तरुणी महिला बेपत्ता झालेल्या आहेत ? आणि या प्रश्नावर सरकारच्या वतीने लेखी उत्तर देण्यात आले ते असे की, १ जानेवारी २०२३ ते ३१ मे २०२३ या ५ महिन्याच्या काळात राज्यात १९ हजार ५३३ तरुणी आणि महिला बेपत्ता झालेल्या आहेत. हा काय छोटा आकडा आहे का ? हा आकडा म्हणजे पोलीस स्टेशनला नोंद झालेल्या तक्रारी, परंतु नोंद न झालेल्या घटना किती असतील ? या आकड्यात १८ वर्षांखालील १ हजार ४३३ मुली आणि १८ हजार १०० महिला अशा एकूण १९ हजार ५३३ मुलींचा आकडा राज्य सरकारने अनिल देशमुख यांना लेखी स्वरूपात दिलेला आहे. जर इतक्या मोठ्या प्रमाणात महिला बेपत्ता होत असतील तर आपण गप्प बसायचे का ? असा सवालही राज्य सरकारला विचारला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *