महसूल विभागाशी संबंधित सामान्य नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करण्याच्या उद्देशाने १ ऑगस्ट या महसूल दिनापासून ‘महसूल सप्ताह ‘ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहात हुतात्मा सैनिकांचे तसेच माजी सैनिकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम राबवला जात आहे, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, नितीन दिनकर, राणी द्विवेदी – निघोट, ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह आदी उपस्थित होते. या सप्ताहात वंचित घटकांच्या मदतीसाठी ‘एक हात मदतीचा ‘यासारखा अभिनव उपक्रम राबविला जात आहे, असेही विखे पाटील यांनी सांगितले.
विखे पाटील यांनी सांगितले की, देशासाठी हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना तसेच माजी सैनिकांच्या कुटुंबियांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबियांना तसेच माजी सैनिकांना शासनाकडून दिल्या गेलेल्या जमिनीवर अतिक्रमणे होतात . अनेकदा कुटुंबियांना व माजी सैनिकांना जमिनीचा ताबा वेळेवर मिळत नाही. या संदर्भातील सर्व प्रलंबित प्रकरणे प्राधान्याने निकालात काढण्याचा प्रयत्न ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या उपक्रमातून केला जाणार आहे. या पद्धतीचा उपक्रम देशात प्रथमच राबविला जात आहे.
विखे पाटील म्हणाले, एक हात मदतीचा या उपक्रमात रायगड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या दुर्घटनेत ज्यांना सर्वस्व गमवावे लागले अशा लोकांना जमिनीचे पट्टे तातडीने देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांचे अर्ज तसेच तक्रारी यांचा वेळेत निपटारा करुन जनतेला दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न १ ते ७ ऑगस्ट या दरम्यान साजरा होणा-या महसूल सप्ताहात करण्यात येत आहे. नवमतदार नोंदणी उपक्रमाबरोबरच विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन युवा संवाद कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना विविध दाखले व योजनांची माहिती दिली जात आहे. महसूल विभागाने वर्षभर केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी दरवर्षी 1 ऑगस्ट हा ‘महसूल दिन’ म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येतो. यंदा महसूल सप्ताह आयोजित करून या अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचा निर्णय विभागाने घेतला असल्याचे नमूद केले.
LIVE |📍मुंबई | भाजपा नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांची पत्रकार परिषद https://t.co/VRbY2i6hcc
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 4, 2023