लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता जाहिर होऊन आज जवळपास चार दिवस झाले. मात्र देशातील सर्व लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी कोणत्या राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांकडून अद्याप जाहिर करण्यात आलेली नाही. निवडणूकांची प्रत्यक्ष नोटीफीकेशन जाहिर होण्यास अद्याप काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. त्यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या युत्या-आघाड्या आणि राजकिय समीकरणं साधण्याला सध्या सर्वच राजकिय पक्षांनी प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे नवी दिल्लीत भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात अर्धातास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत १३ आमदार निवडून आले. त्यानंतरच्या झालेल्या निवडणूकीत मात्र मनसेचा एकही उमेदार निवडूण आला नाही. मात्र तिसऱ्यांदा झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत मनसेचा एकमेव उमेदवार निवडूण आले. मात्र मध्यंतरीच्या कालावधीत मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडूण आले. मात्र त्या सातपैकी ६ नगरसेवकांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. त्यामुळे मुंबई महापालिकेत मनसेचे अस्तित्व शून्य झाले. परंतु राज ठाकरे यांच्याकडून सातत्याने त्यांचे बंधू तथा शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या राजकिय भूमिकेच्या विरोधात भूमिका घेतली.
ज्यावेळी उद्धव ठाकरे हे भाजपासोबत होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने जाण्याचा अलिखित निर्णय घेतला. त्यानंतर काही वर्षातच उद्धव ठाकरे यांनी भाजपाची साथ सोडत काँग्रेस राष्ट्रवादीच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर राज ठाकरे यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीशी अलिखित फारकत घेत भाजपाशी जुळवून घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापासून ते अमित शाह यांच्या पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्या नव्या शिवतीर्थ निवासस्थानी पाहुणचार घेतला.
त्यावरून आगामी काळात राज ठाकरे हे भाजपासोबतच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यातच राज्यात शिवसेना पक्षात फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्या पवार कुटुंबात फूट पाडण्याचे धाडस करण्यात आले. त्यानुसार अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदार-खासदारांच्या एक गटाने भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेत राज्याच्या सत्तेत सहभागीही झाले.
परंतु अजित पवार यांचे भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्यामागचे नेमके काय कारण याची चर्चा यापूर्वीच अनेक माध्यमातून राजकिय वर्तुळात आणि जनतेत पसरली आहे. तशाच पध्दतीची चर्चा यापूर्वी भाजपासोबत गेलेले विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदार-खासदारांबाबतही चर्चा जनतेत पोहचली. आता या दोन्ही चर्चांबरोबर राज ठाकरे यांचे भाजपासोबत जाणे आणि कोहिनूर मिल खरेदी-विक्री प्रकरणावरून ईडीची नोटीस येणे या सगळ्या राजकिय पटलावर दिसणे यावरून जे काही चित्र आहे ते सगळ्यांसमोर दिसणे यावरून राज्यातील जनतेत स्पष्ट झाले आहे.
त्यातच आज मनसे प्रमुख राज ठाकरे हे नवी दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले. तेथे जवळपास ३० मिनिटे चर्चा झाल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात काय चर्चा झाली याची माहिती अद्याप अधिकृतरित्या बाहेर येऊ शकली नाही. परंतु महायुतीत चवथा सहकारी मनसे सहभागी होणार की नाही याची स्पष्टता काही दिवसातच होईल असे सांगण्यात येत आहे.
आज केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाह ह्यांच्याशी दिल्लीत भेट झाली. pic.twitter.com/8XMIEXydYq
— Raj Thackeray (@RajThackeray) March 19, 2024