Breaking News

अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवार यांचे प्रत्युत्तर, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली नवीन कर्तृत्वान पिढी घडवू

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकारणाची पोलखोल करत वाढत्या वयानुसार कुठंतरी थांबायचं असतं असे सांगत निवृत्ती घेण्याचा सल्ला शरद पवार यांना दिला. तसेच शरद पवाराचं राजकारण कसं धरसोडीचं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं किती नुकसान झालं याचा गौप्यस्फोटही केला. अजित पवार यांच्या या भाषणाची शरद पवार यांनीही चिरफाड करत त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी शरद पवार म्हणाले, की, जे गेले त्यांना जाऊ द्या. त्याची चिंता करू नका. त्यांना सुखात राहू द्या. महाराष्ट्रात आपण नवीन कर्तृत्वान पिढी तयार करू, असं सांगत अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असं आवाहनही शरद पवार यांनी उपस्थित राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले, चिन्ह कुठे जाणार नाही. चिन्ह काही निवडणूक ठरवत नाही. माझा अनुभव आहे. गाय वासरू, बैलजोडी, चरखा, पंजावर आम्ही निवडणुका लढवल्या आहे. घड्याळ्यावर लढलो. काही फरक पडला नाही. कुणी सांगत असेल चिन्ह आम्ही घेऊन जाऊ तर चिन्हं जाऊ देणार नाही. चिन्ह जाणार नाही. जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतकरणात पक्षाचा विचार आहे. तोपर्यंत चिंता करण्याचं कारण नाही, अशी ग्वाहीही दिली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे उपमुख्यंमत्री फडणवीस यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी भ्रष्ट आहे असं वाटतं तर काल राष्ट्रवादीलासोबत का घेतलं? म्हणजे हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलत आहेत. आधार नसलेल्या गोष्टी बोलत आहेत. जनमाणसात वातावरण निर्माण करत आहेत. काही लोकांनी बाजूला जाण्याचा निर्णय घेतला. त्याचं दु:ख आहे. जो राजकीय विचार मान्य नाही. त्याविरोधात जाऊन निवडणुकीत मतं घेतली. आता त्याच लोकांसोबत जाणं ही त्या मतदारांशी प्रतारणा आहे. ज्या विचारधारेला विरोध केला त्याच्यांसोबत जाणं योग्य नाही, असं स्पष्ट केले.

अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ यांच्या भाषणाचा शरद पवार यांनी समाचार घेताना म्हणाले, अजित पवार गटाच्या बॅनरवर माझा फोटो होता. त्यांना माहीत आहे आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे माझा फोटो वापरला. काही लोकांनी भाषणं केली. मला गुरु म्हणाले. पांडुरंग… बडवे… कसले बडवे? कसले काय? पांडुरंगाच्या दर्शनाला कुणाला कोणीही थांबवू शकत नाही. त्यासाठी पंढरपूरलाच जायची गरज नाही. पंढरपूरला गेल्यावर बाहेरून दर्शन घेतात आणि आनंदात जातात. पांडुरंग म्हणायचं गुरू म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं. गंमतीची गोष्ट आहे, असा खोचक टोलाही लगावला.

यावेळी शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्याबाबतची आठवण सांगताना म्हणाले, एक नेते तुरुंगात गेले. सहा महिने आत होते. आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न केला. ते तुरुंगातून आल्यावर अनेकांनी म्हटलं त्यांना संधी देऊ नका. ते तुरुंगात गेलेले आहेत. निकाल लागेपर्यंत त्यांना तिकीट नको. मी म्हटलं त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. त्यांना तिकीट दिलं. त्यांना मंत्री केलं. पहिल्या दोन मंत्र्यांमध्ये त्यांचं नाव होतं. त्यांचा दोन दिवसांपूर्वी फोन आला. सकाळी म्हणाले, काय चाललंय. बघतो. जातो. बघून येतो म्हणून गेले अन् मंत्रीपदाची शपथ घेतली, असा खोचक टोलाही भुजबळ यांचे नाव न घेता लगावला.

यावेळी नाशिक येथील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या राड्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा आपण काँग्रेस पक्षाचं कार्यालय आपल्या हातात होतं, पण ती काँग्रेसची प्रॉपर्टी होती. त्यामुळे आम्ही त्या कार्यालयावर ताबा मिळवला नाही. पण नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर काल जो प्रकार घडला त्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी शरद तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, काँग्रेसमध्ये आम्ही लोकं होतं. आम्ही नवीन पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. आम्ही काँग्रेसचं भवन सोडून दिलं. कारण ती संपत्ती काँग्रेस पक्षाची होती. ती आम्ही हिसकावून घेण्याची आवश्यकता नव्हती. आमच्या हातात होती. नाशिकला काय झालं? काही लोक येतात, पोलिसांची मदत घेतात, ताब्यात घेतात आणि सांगतात, हा पक्ष आमचा. ही घड्याळाची खूण आमची आहे.

ठिक आहे, तुम्ही सांगू शकता. निवडणूक आयोगाने घड्याळाची खूण कुणाला दिली? ही सगळ्या देशाला माहिती आहे. तुमच्यासाठी सांगतो, कोण कुठे जाणार नाही, असं आश्वासन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलं. तसेच यावेळी शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असे म्हणाले.

Check Also

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता एकांगी की चुरसीची ?

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच काही लोकसभा मतदारसंघातील लढती या फारच रंजक होणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *