Breaking News

नाना पटोले यांचा विश्वास, …हंडोरे विजयी होणार, आमदार गैरहजेरीच्या केवळ अफवा

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते व महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा उमेदवारी अर्ज प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, समाजवादी पक्ष, शेकाप, माकपासह सर्व मित्रपक्षांचा पाठिंबा आहे. राज्यसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे सर्वाधिक मतांनी विजयी होतील, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक विधान भवनातील काँग्रेस पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीनंतर राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत चंद्रकांत हंडोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे अजय चौधरी व काँग्रेस पक्षाचे आमदार उपस्थित होते.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेसचे आमदार गैरहजर असल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत, त्यात काही तथ्य नाही. तीन-चार आमदार आले नाहीत, त्यांच्याशी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व माझी फोनवर चर्चा झाली आहे व त्यांनी परवानगीही घेतली आहे, वैयक्तिक कारणामुळे ते आलेले नाहीत. मविआला चिंता करण्याची गरज नाही, आमचा एकच उमेदवार आहे आणि तो बहुमताने निवडून येणार आहे. काँग्रेस सरकार अथवा मविआ सरकार असताना विरोधी पक्षांशी चर्चा करून सामोपचारातून बिनविरोध निवडणुका होत होत्या, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे परंतु भाजपाकडे भ्रष्ट मार्गाने कमावलेला पैसा आलेला आहे त्यातून ते निवडणुकीचे राजकारण करत आहेत, असे सांगितले.

इलेक्ट्रोरल बाँड मोठा घोटाळा असल्याच्या राहुल गांधींच्या विधानावर शिक्कामोर्तब..

निवडणूक रोखे योजना असंविधानिक आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचे काँग्रेस पक्ष स्वागत करत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक रोखे (इलेक्ट्रोरल बाँड) हा मोठा घोटाळा असल्याचे त्याचवेळी जाहीरपणे सांगितले होते, त्यांच्या विधानावर सुप्रीम कोर्टाने आज शिक्कामोर्तब केले आहे. भाजपाने आता २०१९ पासून या योजनेखाली घेतलेले पैसे परत करावेत, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.

बार्टीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तातडीने द्या

राज्याच्या सर्वसामान्य जनतेच्या मुला मुलींसाटी बार्टी, महाज्योती, सारथी या संस्थांची स्थापना केलेली आहे. गरिब व सर्वसामान्य कुटुंबातील मुला मुलांना या संस्थाच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते परंतु बार्टीचे विद्यार्थी मागील २४५ महिन्यांपासून शिष्यवृत्ती मिळाली नाही म्हणून सरकारच्या दरवाज्यावर उभे आहेत. गरीब, शेतकरी, शेतमजुकरांच्या मुलांचे आयुष्य बरबाद करण्याचा ठेका सरकारने घेतला आहे का? सरकार या गोरगरिबांच्या मुलांचे दोनवेळचे अन्न व शिक्षण हिरावून घेत आहे. सरकारने या विद्यार्थ्यांची मागण्यांची दखल घेऊन तातडीने शिष्यवृत्ती द्यावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

जरांगे पाटील यांनी प्रकृत्तीची काळजी घ्यावी: थोरात

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, काँग्रेसचे सर्व आमदार एकत्रित आहेत, तीन-चार आमदार परवानगी घेऊन गैरहजर राहिले आहेत, त्यांची पत्रे माझ्याकडे आहेत त्यामुळे आमदार गैरहजर होते या बातम्यामध्ये काहीही तथ्य नाही.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर बोलताना थोरात म्हणाले की, सरकारने जरांगे पाटील यांना काय आश्वासन दिले त्याची पूर्तता झाली पाहिजे परंतु कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. माझी जरांगे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आधी तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहनही थोरात यांनी केले आहे.

Check Also

नाना पटोले यांचे टीकास्त्र, नरेंद्र मोदी फेल झालेले इंजिन…

नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *