Breaking News

१६ ते २५ फेब्रुवारीदरम्यान खादी, सिल्क आणि विविध मराठमोळ्या खाद्यपदार्थांची मेजवानी

स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील जनतेला एका धाग्याने बांधण्याचे आणि स्वदेशीचा स्वाभिमान मनामनात जागवण्याचे काम खादी या महावस्त्राने केले. खादीला आजही मोठी मागणी आहे. खादी उद्योगातील लघु उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ, सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, आदिवासी विकास विभाग, भारतीय लघु उद्योग विकास बॅंक, खादी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाखादी कला-सृष्टी २०२४’ चे आयोजन १६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. या एक्स्पोचे उद्घाटन १६ फेब्रुवारीला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीए च्या मैदानावर होणार आहे.

या कार्यक्रमाला खादी ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार, खादी ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, खासदार पूनम महाजन, आमदार झिशान सिद्दिकी, उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, भारतीय लघु उद्योग विकास बँकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिवसुब्रमण्यम रामन, महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत कुमार, तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला उपस्थित राहणार आहेत.

या एक्स्पोमध्ये खादी वस्त्रांच्या सोबतच महाराष्ट्रातील लघु उद्योजकांची निर्मिती असलेल्या पैठणी, हिमरु शाल, बांबुच्या वस्तु, वारली पेंटिंग, महाबळेश्वर मधुबन मध, कोल्हापुरी चप्पल, मसाले, केळीचे विविध पदार्थ इत्यादींसोबतच महाराष्ट्रातील विविध पारंपरिक खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे. कापड उद्योग आणि फॅशन इंडस्ट्री याची वाढ आणि विकास यावरील चर्चासत्रे, परिसंवाद याशिवाय फॅशन शो आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. तसेच याठिकाणी उभारण्यात येणा-या ‘एक्सपिरीएंस सेंटर’ मध्ये चरख्यावरील सुतकताई, हातमागावर कापड निर्मिती, बांबुच्या वस्तुची निर्मिती आदींचा प्रत्यक्ष अनुभव आणि प्रात्यक्षिक १६ ते २५ फेब्रुवारी दरम्यान अनुभवता येणार आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी केले आहे.

Check Also

भारतीय निवडणूक प्रक्रियेचे चार देशांच्या परदेशी शिष्टमंडळाकडून कौतुक

भारतासारख्या लोकशाही देशात निवडणूक प्रक्रिया ही खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. येथील मतदारांचा स्वयंप्रेरीत मतदानासाठीचा उत्साह …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *