Breaking News

नाना पटोले यांची टीका, राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखण्याचे कृत्य सत्तेचा…

भारत जोडो यात्रेला ईशान्य भारतात प्रचंड जनसमर्थन मिळत आहे. यात्रेला मिळत असलेला जनतेचा प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्ष घाबरला असून या भितीतून भारत जोडो न्याय यात्रेवर भ्याड हल्ले करण्यात येत आहेत. आज राहुल गांधी आसाममधील मंदिरात दर्शन करण्यास जात असताना त्यांना मंदिरात जाऊ दिले नाही. मंदिरात जाण्यास आता भाजपाची परवानगी घ्यावी लागणार आहे का? असा संतप्त सवाल करत मंदिरात जाण्यापासून रोखण्याचे कृत्य सत्तेचा अहंकार व मग्रुरीचा प्रकार आहे, असा घणाघाती प्रहार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला, ते म्हणाले की, एकीकडे देशात प्राण प्रतिष्ठा केली जात असताना दुसरीकडे मात्र मंदिरात जाऊन दर्शन घेण्यापासून रोखणे हे अत्यंत चुकीचे आहे. राहुल गांधी यांना दर्शनापासून रोखणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा काँग्रेस तीव्र निषेध करत आहे. प्रभू रामाने कधी कोणाचा द्वेष केला नाही, हिंसेचा मार्ग अवलंबला नाही. मंदिरात प्रवेश नाकारणे, हल्ला करणे ही प्रभू श्रीरामाची शिकवण नाही पण भाजपा रामाच्या नावारवर फक्त राजकारण करत आहे. राहुल गांधींना आज मंदिर प्रवेश नाकारणाऱ्या लोकांनीच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखले होते. मंदिर प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मोठे आंदोलन करावे लागले होते आणि ह्याच प्रवृत्तीचे लोक आज सत्तेत आहे.

भारत जोडो यात्रेवर होत असलेले भ्याड हल्ले पाहता चलो आसाम म्हणत मोठ्या संख्येने आसामकडे जाण्यास तयार होतो पण वरिष्ठ नेत्यांनी असे करण्यापासून रोखले. काँग्रेस अहिंसा व सत्याच्या मार्गानेच आपला प्रवास सुरु ठेवणार आहे असे सांगण्यात आले. यात्रेमध्ये सातत्याने अडथळे निर्माण करणे, यात्रेच्या ताफ्यावर हल्ले करणे असे प्रकार सत्तेचा माज दाखवतात. भाजपाचा हा स्तेतचा माज जनताच उरवेल असेही नाना पटोले म्हणाले.

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, रामाचे दर्शन घेण्यापासून किंवा अयोध्येला जाण्यापासून कोणालाही रोखलेले नाही. भाजपा प्राण प्रतिष्ठेचा राजकीय मुद्दा बनवत आहे तसेच काँग्रेसने राम मंदिराला कधीही विरोध केला नाही, भाजपा अप्रचार करत असून काँग्रेसबद्दल चुकीची माहिती देत आहेत. वास्तविक पाहता तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनीच राम मंदिराचे कुलूप काढून दर्शन सुरु केले. शिलान्यासही केला. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा मार्गही काँग्रेस सरकार असतानाचा काढण्यास आला होता. असेही पटोले म्हणाले.

या पत्रकार परिषदेला प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रवक्ते डॅा. राजू वाघमारे उपस्थित होते.

Check Also

श्याम मानव यांचा मोठा गौप्यस्फोट: अनिल देशमुख यांनी दिला दुजोरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथपत्र द्या, नाही तर अजित पवार यांच्या विरोधात द्या

तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शपथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *