Breaking News

संजय राऊत यांची स्पष्टोक्ती; मोर्चा होणारच, मविआच्या अडथळ्यासाठीच बीआरएस महाविकास आघाडीला अडथळ्यासाठी महाराष्ट्रात बीआरएसाचा शिरकाव

भाजपा आणि शिंदे गटाला आव्हान असणाऱ्या महाविकास आघाडीला अडथळे निर्माण करण्यासाठीच महाराष्ट्रात बीआरएसला शिरकाव करू दिला जात आहे, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. यावेळी त्यांनी बीआरएस ही भाजपाची बी टीम असल्याची टीका करतानाच बावनकुळे केसीआर यांची वकिली का करतात, असा सवालही केला. तसेच मुंबई महापालिकेवर विविध मागण्यांप्रश्नी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला राज्य सरकारने परावनगी नाकारली तरी मोर्चा १ जुलै रोजी होणारच असा निर्धार व्यक्त करत मार्ग बदलला, पाऊस आला तरी मोर्चा होणारच असेही स्पष्ट केले.

भाजपासह सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी चालविली आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी मिशन २०२४ सुरू केले आहे. तर विरोधकही स्वतःला राष्ट्रभक्त म्हणवत भाजपा विरोधात एकत्र येत आहेत. नुकतीच देशभरातील विरोधकांची पाटणा येथे बैठकही पार पडली. मात्र त्याच दरम्यान आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे भरणाऱ्या लाखो वैष्णवांच्या मेळाव्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सहाशे गाड्यांच्या ताफ्याचीही भर पडली. के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांनी पंढरपूरमध्ये जात विठ्ठलाचे दर्शन घेतले. तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक झाले. याच दौऱ्यात राष्ट्रवादीचे दिवंगत नेते भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके यांनी के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहेच, पण महाविकास आघाडीसाठीही अडथळा आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेल्या संजय राऊत यांनी केसीआरच्या निमित्ताने भाजपावर निशाणा साधला.

संजय राऊत यांनी सांगितले की, भाजपा महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बी टीम, सी टीम बनवत आहेत. २०१९ मध्ये त्यांनी एमआयएमला तयार केले आणि आता २०२४ साठी बीआरएसला तयार केले जात आहे. कधी मनसेला बी टीम बनवतात तर कधी आणि कुणाला तयार करतात. आताही केसीआर यांना बोलावले आहे. पण महाविकास आघाडी सगळ्या प्रकारच्या लढाईसाठी तयार आहे. ही लढाई महाविकास आघाडी जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला.

संजय राऊत म्हणाले, केसीआर यांनी तेलंगणातील लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्यावेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे हित पाहण्यासाठी इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांना इथे येण्याची गरज नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी केसीआर यांना खडसावले. आंध्र प्रदेशमध्ये देखील बीआरएस पक्ष नाही. पण ते महाराष्ट्रात येतात. यामागे भाजपाने त्यांना सुपारी दिली आहे. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला त्रास देण्यासाठी बीआरएसला राज्यात बोलावण्यात आले आहे.

यावेळी त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समाचार घेतला. चंद्रशेखर बावनकुळे हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची वकिली केव्हापासून करायला लागले? त्यांनी स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्यावे. चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाची सी टीम आहेत. त्यांच्या हातात काही नाही. सगळे काही दिल्लीतून ठरवले जाते. महाराष्ट्र भाजपाची कमान देवेंद्र फडणवीस यांच्या हातात नाही आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातातही नाही. सगळे काही दिल्लीतील नेते ठरवतात. त्यानुसारच पुढे सगळे घडते, असे संजय राऊत म्हणाले.

Check Also

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठी मागितल्या या गोष्टी, पण पंतप्रधान मोदींकडून साधा उल्लेखही नाही

स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेस विसर्जित करावी असा सल्ला महात्मा गांधींनी दिला होता. त्यानुसार काँग्रेस विसर्जित झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *