Breaking News

राणेंपेक्षा खडसे काय वाईट? भाजपच्या आमदार-मंत्र्यांचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदे पालटाविषयीच्या चर्चांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली. मात्र मंत्रिमंडळातील संभावित बदल आणि विस्ताराला आता गुजरात निवडणूकीनंतरचा मुहूर्त लागलेला असला, तरी मंत्रिमंडळ विस्तारात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा पुन्हा एकदा मंत्री म्हणून समावेश करायला हवा अशी मागणी भाजपच्या मंत्र्यांकडून करण्यात येत असून राणेंपेक्षा खडसे काय वाईट असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

राज्याच्या संभावित मंत्रिमंडळ विस्तार आणि खांदेपालटात विद्यमान मंत्र्यांमधील काही जणांना नारळ देणार असल्याची चर्चा आहे. तर काही मंत्र्यांची खाती बदलण्यात येणार आहेत. या संभावित विस्तारात आपली वर्णी लागावी यासाठी अनेक आमदार आणि राज्यमंत्री पडद्यामागच्या हालचाली करत आहेत. मात्र काल-परवा कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देवून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिलेल्या महाराष्ट्र स्वाभीमानी पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यापेक्षा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा समावेश व्हायला हवा अशी भावना भाजपच्या एका राज्यमंत्र्याने व्यक्त केली.

सद्यपरिस्थितीत राज्यात आणि विधिमंडळात विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पुढे यावे लागते. इतर कोणताही मंत्री कॅबिनेट अथवा राज्यमंत्री असो तो कधीही पुढे येताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारमधील मंत्र्यांचे अस्तित्व असून नसल्या सारखे जाणवत आहे. या उलट खडसे हे मंत्रिमंडळात असताना विरोधकांच्या टीकेला विधिमंडळासह राज्यातही प्रतित्तुर देण्यास सदैव तत्पर असत. त्याचबरोबर ते इतर सहकारी मंत्री-आमदारांच्या मदतीलाही धावून जात. त्यामुळे त्यांची गरज मंत्रिमंडळाला जास्त आहे. मात्र राणे यांच्या समावेशाने राज्य सरकारला फारशी मदत होईल अशी शक्यता वाटत नसल्याचे मतही अन्य एका भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांने व्यक्त केली.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधीही होवो त्यात एकनाथ खडसे यांचा समावेश झालाच पाहिजे यासाठी आम्ही आग्रही असून याबाबत लवकरच काहीजणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांसह दिल्लीतील नेत्यांची भेट घेणार असल्याचे पश्चिम विदर्भातील एका आमदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *