लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता देशभरात लागू होऊन एक आठवडा आज पूर्ण होत आहे. मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीकडून अद्यापही उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. त्यातच इंडिया आघाडीचे सदस्य असलेल्या आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना दिल्ली लिकर पॉलिसीप्रकरणी ईडीने अटक केली. तसेच आम आदमी पार्टीचे दिल्लीतील पक्ष कार्यालयही सील केले. तसेच निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाची बँक खाती सील करण्यात आली आहेत. यापार्श्वभूमीवर दिल्लीतील रामलीला मैदानावर या दोन्ही घटनांच्या विरोधात आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इंडिया आघाडीच्यावतीने महारॅली आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. हि महारॅली ३१ मार्च रोजी होणार असल्याचेही यावेळी जाहिर करण्यात आले.
तर एकाबाजूला लोकसभा निवडणूकांची घोषणा करण्यात आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस पक्षाची लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर बँक खाती आयकर विभागाने सील केली आहेत. त्यामुळे निवडणूकीच्या रिंगणातून विरोधकांना बाजूला सारण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारकडून करण्यात येत आहे. त्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू केलेली असल्याने राजकीय विरोधकांना केंद्र सरकारच्या विविध यंत्रणाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईला कायदेशीर उत्तर द्यायचे की पक्षाचे उमेदवार जाहिर करून निवडणूकीच्या माध्यमातून लढत द्यायची असा पेच प्रमुख विरोधी पक्षांसमोर निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील लढाई अधिक तीव्र करण्यासाठी या रामलीला मैदानावरील महारॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे आम आदमी पार्टीच्यावतीने सांगण्यात येत आहे.
दरम्यान, दिल्लीसह देशभरातील अनेक राज्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने आजही सुरुच ठेवली आहेत. तर दिल्ली पोलिसांकडून आम आदमी पार्टीच्या आमदार आणि खासदारांच्या हिंडण्याफिरण्यावर बंधने घालण्यात येत आहेत.