Breaking News

सत्तेतील शंभर दिवसः राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे जनतेला पत्रातून वचन कामाच्या मार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंड...

रोजगार, सर्व समाजघटकांचे आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे राज्य सरकारचे उद्दीष्ट असून येत्या काळात या सर्व विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या माध्यमातून अधिक जोमाने काम करेल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

महायुतीत सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसला आज १० ऑक्टोबर रोजी शंभर दिवस पूर्ण झाले असून अजित पवार यांनी पत्राच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.

टिका ही राजकीय नेत्याच्या जीवनाचा भाग आहे आणि सकारात्मक टीकेची मी नेहमीच दखल घेतली आहे. मात्र केवळ राजकारणासाठी राजकीय टिका हा माझा प्रांत नाही. मी सकारात्मक, विकासात्मक राजकारणावर विश्वास असणारा राजकीय कार्यकर्ता आहे. हाती घेतलेले कुठलेही काम मार्गी लावणे, त्या कामाच्या मार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंड आहे अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श, फुले, शाहू आंबेडकरांचे विचार आणि वंदनीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या लोककल्याणाचे धोरण यांचा वारसा जपला असून माझ्या नेतृत्वाखाली पुढील काळात हीच परंपरा कायम जपणार असल्याचे वचन अजित पवार यांनी दिले.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही अनेक मोठया नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतले आहेत. अशा प्रकारचे निर्णय हे त्या – त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस २ जुलै २०२३ रोजी महायुतीमध्ये सहभागी झाल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी समाजकारण करताना मांडलेले ‘बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व’ हे सुत्र ही प्रेरणा असल्याचे सांगतानाच याच भूमिकेतून महापुरुषांचा आदर्श घेत लोककल्याणासाठी हाती घेतलेला ‘वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा’ अशी ग्वाहीही अजित पवार यांनी दिली.

येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या, युवकांच्या, महिलांच्या तसेच विविध समाजघटकांच्या हिताचे रक्षण करण्याच्या भूमिकेतून राज्य सरकारमध्ये कार्यरत असेल असा शब्द अजित पवार यांनी पत्रात दिला.
नव्या सरकारमध्ये सामील होताना पत्रात मांडलेली भूमिका आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. याच मार्गावर गेले शंभर दिवस वाटचाल केली आहे आणि पुढेही करत राहू असा विश्वासही अजित पवार यांनी पत्राच्या शेवटी जनतेला दिला.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *