Breaking News

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात भाजपच्या डॉ.आशीष देशमुखांचे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन

नागपूर : प्रतिनिधी

नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरात गारपीटीमुळे १२५ गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या गारा इतक्या मोठ्या होत्या की तब्बल १२ तासानंतरही रस्त्याच्या कडेला गारांचे खच पडलेले पहायला मिळाले. त्यामुळे या भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पाहणी करावी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवेपर्यत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केल्याची माहिती भाजपचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी दिली.

सोमवारी या गारा पडल्या असतील, तेव्हा गारांचा आकार आजच्यापेक्षा कितीतरीपट जास्त होता, असे परिसरातील शेतकरी सांगतात. या गारांमुळे परिसरातील अनेक लोक जखमी झाले व त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शेतकऱ्यांची जनावरेही गारपीटीमुळे जखमी झाली.  गेल्या २ दिवसांत विदर्भात झालेली गारपीट आणि अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, संत्र, मोसंबी, लिंबू, फळबागा आणि भाजीपाल्याचे हाता तोंडाशी आलेले पिक वाया गेले. त्यामुळे गारपिटीच्या व पावसाच्या भीतीने विदर्भातील शेतकरी प्रचंड दहशतीखाली असल्याची भीतीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कापसावर यंदा बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात मात्र काटोल, नरखेड, मौदा, कळमेश्वर व रामटेक या पाच तालुक्यात बोंडअळीमुळे नुकसान झालेच नाही, असे म्हटले आहे. हे सर्वेक्षण चुकीचे आहे. पुन्हा सर्वेक्षण व्हावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. पात्र असलेल्या ७० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, खरिपातले पीक गेले आणि आता गारपीटीमुळे रब्बीतील पिकेही गेलीत. या संकटांमुळे शेतकरी हवालदील आहे. सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे मागण्यांची तड लागेपर्यंत १४ फेब्रुवारी पासून काटोल येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आल्याचे सांगत मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *