Breaking News

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाची न्यायालयीन चौकशी करा अजित पवार यांनी मागणी करत भाजपवर केला पलटवार

मुंबई : प्रतिनिधी

सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरु होताच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर कथित भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे यासंदर्भातील ऑडिओ क्लीप विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती, मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी ऐकावी आणि गरज पडल्यास त्यांची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी दस्तुरखुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी करत सत्ताधारी भाजपवर पलटवार केला.

सत्ताधारी भाजपचे अनिल गोटे, मेधा कुलकर्णी, मनिषा चौधरी यांच्यासह अनेक सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत एकत्र येत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधातील फलक फडकावित त्यांच्या निलंबनाची मागणी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यासाठी पैसे मागितल्याचा गौप्यस्फोट काल एका दूरचित्रवाणीने केल्याचे सांगत प्रशांत परिचारक प्रमाणे धनंजय मुंडे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी भाजप आमदार अनिल गोटे यांनी केली. तसेच भाजपच्या सदस्यांनी धनंजय मुंडे हाय हाय अशा घोषणा करत गोंधळास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज पहिल्यांदा १० मिनिटांसाठी तहकूब केले.

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी अनिल गोटे यांना बोलण्याची संधी दिली. त्यावेळी गोटे म्हणाले की, परिचारक यांच्याविषयीचा मुद्दा आल्यानंतर त्यांना आधी निलंबित केले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप झाला आहे. मुंडे यांचे कृत्य हे देशद्रोह्याचे कृत्य असल्याचा आरोप करत आम्ही विरोधी पक्षात असताना त्यावेळचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावरही शरद पवार यांनी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. मात्र त्यात काहीही तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांना निलंबित करून त्यांची चौकशी करावी अशा मागणी केली.

त्यावर एकनाथ खडसे हे मध्येच उठून उभे रहात म्हणाले की, पटलावर चुकीची माहिती जावू नये म्हणून माझ्यावर पैसे घेतल्याचा नाही तर तोडपाणी करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. मात्र त्यात काहीही तथ्य आढळले नाही.

त्यातच सत्ताधारी बाकावरील सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात गोंधळ सुरु झाल्याने पुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून गोंधळ पुन्हा सुरु करण्यात आला. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार हे म्हणाले की, अनिल गोटे यांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. ज्या ऑडिओचा उल्लेख केला. तो ऑडिओ मुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी एकत्रित बसून ती क्लीप ऐकावी. त्यात जर तथ्य आढळले तर मुंडे यांची न्यायालयीन चौकशी करावी.

तेवढ्यात अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचे कामकाज ५ मार्चपर्यत तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *