Breaking News

प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, रश्मी बागल यांचा भाजपात

माजी राज्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सोलापूर जिल्ह्यातील रश्मी बागल,मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह राज्यातील विविध पक्षांतील असंख्य नेते व कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे स्वागत केले. बसवराज पाटील, रश्मी बागल यांसारख्या नेत्यांमुळे भारतीय जनता पार्टी आणखी मजबूत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा, खा.सुधाकर शृंगारे,खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, आ. राणा जगजितसिंह पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडविण्याच्या संकल्पात हातभार लावण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीत अनेक जण प्रवेश करीत आहेत. विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या इच्छेनेच बसवराज पाटील यांच्यासारखं जुनं, जाणतं आणि सुसंस्कृत नेतृत्व भारतीय जनता पार्टीत सहभागी झालं आहे. बसवराज पाटील, रश्मी बागल यांच्यासारखे नेते कोणत्याही अपेक्षेने पक्षात आलेले नाहीत. त्यांच्याकडून समाजहिताच्या ज्या मागण्या मांडल्या जातील त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असेही नमूद केले.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पक्षवाढीसाठी घेत असलेल्या परिश्रमांचे विशेष कौतुक केले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी म्हणाले की, अनेक वर्षे काँग्रेसचे काम निष्ठेने केलेल्या बसवराज पाटील यांच्यासारख्या नेत्यालाही देशाचा विकास नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वच करू शकेल याची खात्री वाटत आहे. ”मोदी की गॅरंटी” वर विश्वास ठेवूनच समाजातील विविध घटकांतील नेते कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत.

आपण ४० वर्षे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काँग्रेस पक्षासाठी काम केले. त्याच निष्ठेने आपण भारतीय जनता पार्टीसाठी काम करू, असे मनोगत बसवराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्प पत्रासाठी सामान्य जनतेकडून सूचना मागविण्याच्या अभियानाचा प्रारंभ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. ”उबाठा” मधून भाजपामध्ये आलेल्या राम गावडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर लिहिलेल्या जननायक या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण मतदान ६६.९५% इतके नोंदवले गेले आहे, निवडणूक आयोगाने गुरुवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *