वानगाव : प्रतिनिधी
सत्ता आणि पैशाचा गैरवापर करून अनैतिक मार्गाने निवडणुका जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, पण पालघरची स्वाभिमानी जनता भाजपच्या धनशक्तीचा पराभव करून प्रामाणिक आणि निष्ठावंत उमेदवार दामू शिंगडा यांना विजयी करेल असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार दामू शिंगडा यांच्या प्रचारासाठी खा. अशोक चव्हाण आज पालघर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. डहाणू तालुक्यातील वानगाव येथे सभेला संबोधित करताना ते बोलत होते. स्व. चिंतामन वनगा यांच्या नावाने भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष भांडत आहेत. भाजपने वनगा यांच्या मृत्यूनंतर वनगा परिवाराची उपेक्षा केली. भाजपला उमेदवार मिळत नव्हता म्हणून गावितांना पळवून नेऊन उमेदवारी दिली. गावितांचा पराभव समोर दिसत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री मंडळातील डझनभर मंत्री पालघर जिल्ह्यात फिरत आहेत. गेल्या चार वर्षात सत्तेत आल्यापासून भाजपने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. मोदी आणि फडणविसांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने आदिवासींच्या विकास योजनांच्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. समृध्दी महामार्ग आणि बुलेट ट्रेनच्या नावाखाली गरीब शेतकरी आणि आदिवासींच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. फडणवीसांना पालघरच्या विकासापेक्षा मोदींच्या गुजरातच्या विकासाची जास्त चिंता आहे. फडणवीसांच्या भाषणबाजीला आता जनता भुलणार नाही. पालघर जिल्हा काँग्रेसला मानणारा जिल्हा असून माजी खा. दामू शिंगडा हेच आदिवासींच्या समस्यांची जाण असणारे प्रामाणिक आणि निष्ठावंत उमेदवार आहेत. भाजपकडे पैसा आहे तर काँग्रेसकडे माणुसकी आहे. दामू शिंगडा यांना विजयी करून भाजपच्या धनशक्तीला पराभूत करा असे आवाहन खा. चव्हाण यांनी उपस्थितांना केले.
या सभेला मार्गदर्शन करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र गवई म्हणाले की, काँग्रेसशिवाय देशाला भविष्य नाही. संविधान आणि पर्यायाने देश वाचवायचा असेल तर भाजपचा पराभूत करून काँग्रेसला विजयी करा.
या सभेला पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार दामू शिंगडा, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री शंकर नम, विधानपरिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. शरद रणपिसे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चारुलता टोकस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आनंद ठाकूर यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विश्वनाथ पाटील, यशवंत हाप्पे, विनायक देशमुख, सचिव मनिष गणोरे, पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष केदार काळे, राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल भुसारा यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.