भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१९ साली भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले, अशी टीका फडणवीसांनी केली. तसेच उद्धव ठाकरे यांचं दुकान आम्ही का बंद केलं? याचं कारणही देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणातून दिलं. ते अकोला येथे बोलत होते.
उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०१९ साली उद्धव ठाकरे जेव्हा भाजपाच्या पाठीत खंजीर खूपसून आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन खुर्चीच्या मोहाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. तेव्हा मी महाराष्ट्राच्या विधानसभेत ठणकावून सांगितलं होतं की,’मेरा पानी उतरता देख किनारे पर घर मत बना लेना, मैं समंदर हूं लौटकर जरूर आऊंगा’. त्यानंतर मी परत तर आलोच, पण एकनाथ शिंदेंनाही बरोबर घेऊन आलो.
उध्दव ठाकरे यांना प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पण ते (उद्धव ठाकरे) अजूनही भाषणं ठोकतायत. ते अजूनही जागे झाले नाहीत. लोक रोज त्यांचा पक्ष सोडून जात आहेत. ४० आमदार नाकाखालून निघून गेले आणि यांना समजलंही नाही.
मला आठवतंय, बाळासाहेब ठाकरेंनी एकदा सांगितलं होतं. ज्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल, त्यादिवशी मी माझ्या शिवसेनेचं दुकान बंद करेन, पण त्यांच्याबरोबर जाणार नाही. पण उद्धव ठाकरे खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरेंचं दुकान बंद केलं आणि बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात पुन्हा जिवंत केला. जो हिंदुत्वासाठी आणि भारतवर्षामध्ये हिंदुत्वाचं जागरण करण्यासाठी शिवसेनेच्या रुपाने मजबुतीने उभा आहे, असंही फडणवीस म्हणाले.
🕗7.50pm | 18-06-2023📍Tower Chowk (Akola) | संध्या. ७.५० वा | १८-०६-२०२३📍टॉवर चौक (अकोला)
LIVE | मोदी@९ महाजनसंपर्क भव्य सभा
Modi@9 #MahaJanSampark Grand Public Meeting@BJP4Maharashtra @narendramodi #9YearsOfSustainableGrowth #9yearsofseva https://t.co/iozxwDdf8D— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 18, 2023