विरोधकांना दुसरा मुद्दा राहिलेला नसल्याने एकमेकांची उणीधुणी काढून हेडलाईन मिळवायची हे काम उरलेले आहे असा टोला लगावतानाच आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, प्रवक्ते, कार्यकर्त्यांनी अशा मुद्यांवर बोलताना मर्यादा बाळगायला हवी. आपल्या वक्तव्यातून कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. निवडणुकीसाठी उरलेले काही दिवस सर्वांनी मिळून जोरकसपणे काम करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजी नगर येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय सेलच्यावतीने राज्यव्यापी संविधान गौरव मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते.
अजित पवार म्हणाले, आपण सर्वजण समतेचा विचार करणारे… लोकशाही मानणारे… बहुमताचा आदर करणारे… सर्व जातीधर्मांच्या लोकांना न्याय कसा देता येईल ही आपली भूमिका असते सत्तेला हापापलेले आपण नाहीये. ज्या भागाचे आणि राज्याचे प्रतिनिधीत्व आपण करतो त्या भागातील जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे… विकासात कुठे मागे न रहाता त्याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे असेही सांगितले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेले संविधान जोपर्यंत सुर्य-चंद्र आहे, तोपर्यंत कोणाच्या मायेचा लाल हे संविधान बदलू शकत नाही. पण जाणीवपूर्वक समाजातील घटकांना भीती दाखवण्याकरीता, समाजात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी काही चुकीच्या बातम्या पसरविल्या जातात याबद्दल अजितदादा पवार यांनी नाराजी व्यक्त केली.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुका आल्याने मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होतोय अशा वल्गना केल्या जातात. त्यातून काही लोक महाराष्ट्रातील मराठी माणसाची मते मिळवण्यासाठी… समाजात तेढ निर्माण करून जातीय विष पेरण्याचे काम करतात. परंतु महायुती सरकारच्या माध्यमातून एक लाख पाच हजार कोटींची विकासकामे प्रगतीपथावर आहेत.आज देशात ड्रग्ज रॅकेट मोठ्याप्रमाणावर सुरु आहे. यातून नवी पिढी बेचिराख करण्याचा अधिकार कोणाला दिलेला नाही. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना याचे धागेदोरे शोधण्याच्या सूचना केल्या आहे. कोणीही मायचा लाल असला तरी त्याला सोडायचे नाही. अशा आरोपींना थेट फाशीची शिक्षा दिली पाहिजे हे केल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने चांगला समाज निर्माण करता येणार नाही असे वक्तव्यही केले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न काही दिवसापूर्वी निर्माण झाला. परंतू प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. जो आपल्याला बाबासाहेबांनी दिलाय. जसे संविधान बाबासाहेबांनी दिले तशी कायदा आणि घटनाही त्यांनी दिलीय. जगातील अनेक देशात कित्येक प्रसंग आले परंतु आपला देश एकसंघ राहण्याचे एकमेव कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान आणि त्यांनी दिलेली घटना जी आपण कधीच विसरू शकत नाही असेही सांगितले.