Breaking News

शिंदे-फडणवीस यांनी नियुक्ती पत्र दिलेल्या ‘त्या’ उमेदवारांनी अजित पवारांचे मानले आभार

राज्य शासनाच्या विविध निवड प्राधिकरणांनी निवड आणि शिफारस केलेल्या मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील सुमारे १ हजार ६४ उमेदवारांच्या शिष्टमंडळाने आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या पुढाकारासाठी आणि मदतीसाठी आभार मानले. विशेष म्हणजे या सर्व उमेदवारांना नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले होते. तरीही या उमेदवारांनी अजित पवार यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले.

विधान भवनातील विरोधी पक्षनेते कार्यालयात विरोधी पक्षनेते अजित पवार यांची अधिसंख्य पदावर नियुक्ती मिळालेल्या मराठा समाजासह अन्य प्रवर्गाच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली.

या शिष्टमंडळात संग्राम भोसले, सचिन भंडारे, नितीन पाटील, अशोक कदम, किरण वाकळे, संतोष जाधव, राहुल गोर्डे, प्रविण थोरात, अविनाश पाटील, सचिन दळवे, रोहित पाटील, महावीर शेळके, प्रियांका शिंदे, किरण गायकवाड, अमोल गोर्डे, नरेश देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग (ईएसबीसी) प्रवर्गास सरळसेवेत १६ टक्के आरक्षणाचा निर्णय २०१४ मध्ये झाला होता. त्यास उच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१४ मध्ये स्थगिती दिली. २०१८ मध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) यास सरळसेवेत १३ टक्के आरक्षण देण्याचा कायदा करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२० रोजी या कायद्याला स्थगिती दिली होती. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा रद्द केला. न्यायालयीन स्थगिती, कोरोनामुळे असलेले लॉकडाऊन, शासकीय पद भरतीला निर्बंध होते. या प्रकरणात मराठा समाजासह अन्य प्रवर्गातील १ हजार ६४ उमेदवारांना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांनी सातत्याने संबंधित विभागाच्या बैठका घेऊन या प्रकरणात उमेदवारांना न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न केला होता.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतलेल्या पुढाकार आणि मदतीसाठी मराठा समाजासह अन्य प्रवर्गाच्या उमेदवारांच्या शिष्टमंडळाने आज त्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

Check Also

नाना पटोले यांचे टीकास्त्र, नरेंद्र मोदी फेल झालेले इंजिन…

नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *