Breaking News

महाराष्ट्रातील या खेळाडूंना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान

क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या खेळाडूंना विविध श्रेणीतील राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चिराग शेट्टी याना मेजर ध्यानचंद खेलरत्न, ओजस देवतळे व आदिती स्वामी यांना अर्जुन पुरस्कार व मल्‍लखांब प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यावर्षी दोन खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ तर २६ खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ सन्मानित करण्यात आले. यासह एकूण नऊ खेळाडूंना आणि क्रीडा प्रशिक्षकांना ‘द्रोणाचार्य’ श्रेणीतील ‘जीवनगौरव पुरस्कार’, ‘नियमित द्रोणाचार्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.

यासोबतच ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील तीन खेळाडूंना प्रदान करण्यात आले. ‘मौलाना अबुल कलाम आझाद चषक’ गुरू नानक विद्यापीठ, अमृतसर, लवली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब आणि कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र या तीन संस्थांना प्रदान करण्यात आले.

चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना ‍मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

मुंबईचे चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना बॅडमिंटनसाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे उदय पवार बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रशिक्षण सुरू केले. नंतर त्यांनी हैदराबाद येथील गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमधून प्रशिक्षण घेतले. चिराग शेट्टीना यापूर्वी ऑगस्ट २०२० मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्‍यांना बॅडमिंटनसाठी असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तथापि, ते सध्या मलेशियन ओपन स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे, या पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही.

ओजस देवतळे व आदिती स्वामी यांना अर्जुन पुरस्कार प्रदान

ओजस देवतळे- नागपूरचा गोल्डन बॉय, २१ वर्षीय तेजस प्रवीण देवतळे यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये जर्मनीतील बर्लिन येथे झालेल्या चॅम्पियनशिपच्या कंपाउंड तिरंदाज स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. ओजसने चीनमधील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण पदके जिंकून आणखी एक विक्रम केला. ओजस देवतळे यांच्या तिरंदाजीतील असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

आदिती स्वामी – सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथील आदिती गोपीचंद स्वामी ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’ मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली असून, त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आदिती ही कमी वयात जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करणारी खेळाडू आहे. वर्ष २०२३ मध्ये जर्मनी येथील बर्लिनच्या तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड तिरंदाजीमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. आदितीने भारताला १४ वर्षांनंतर विश्व करंडक स्पर्धेत ७२० पैकी ७११ गुण मिळवत जागतिक विक्रम केला आहे. भारताला एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप अशा अनेक स्पर्धांमधून तिने सुवर्णपदके मिळवून दिली आहेत. आदिती स्वामी यांच्या तिरंदाजीतील असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

गणेश देवरूखकर यांना उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान

गणेश देवरुखकर हे व्यायामशाळा संचालक, प्रशिक्षक, परीक्षक आणि कलाकार आहेत. ते मुंबईतील श्री पार्लेश्वर व्यायामशाळेचे मालक आणि व्यवस्थापक आहेत. एक अनुभवी मल्लखांबपटू, म्हणून त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे आणि विविध पदके जिंकली आहेत.  देवरुखकर यांना त्यांच्या मलखांब प्रशिक्षणा असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांची यादी

मेजर ध्यानचंद खेलरत्न : चिराग शेट्टी आणि सात्त्विक साईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन), अर्जुन पुरस्कार : ओजस देवतळे, आदिती स्वामी (दोघे तिरंदाजी), मुरली श्रीशंकर, पारुल चौधरी (दोघे अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाल, दिव्यक्रिती सिंग (घोडेस्वारी), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक, सुशीला चानू (दोघे हॉकी), पवनकुमार, रितू नेगी (दोघे कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बॉल्स), ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, ईशा सिंह (दोघे नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार, अंतिम (दोघे कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा-तिरंदाजी), इलुरी रेड्डी (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा-कॅनोइंग). ’

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी) : ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा-अ‍ॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंह (हॉकी), गणेश देवरुखकर (मल्लखांब). ’

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव): जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई (कबड्डी), जयंता कुमार पुशीलाल (टेबल टेनिस). ’

ध्यानचंद जीवनगौरव: मंजुषा कन्वर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी), कविता सेल्वराज (कबड्डी)

Check Also

लखनौचा आदित्य श्रीवास्तव युपीएससी परिक्षेत पहिला

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२३ परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइटवर जाहीर केला आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *