Breaking News

आरएसएसचा अजेंडा हाणून पाडण्यासाठी भीमशक्तीचा काँग्रेस आघाडीला पाठिंबा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून भारताला हिंदू राष्ट्र बनवणे व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना बदलणे हा त्यांचा अजेंडा आहे. भाजपाचा ४०० पारचा नारा हा दोन तृतियांश बहुमतासाठी असून एवढे बहुमत मिळाले की भाजपा राज्यघटना बदलणार हे भाजपाचे नेतेच जाहीरपणे सांगत आहेत. आरएसएस व भाजपाचा हा अजेंडा हाणून पाडण्यासाठी भिमशक्ती काँग्रेस आघाडीला पाठिंबा देत असल्याचे भिमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष, खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी जाहीर केले आहे.

चेंबूरच्या नालंदा हॉल येथे भीमशक्तीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ऑनलाईन संबोधित केले. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रकांत हंडोरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यास २७२ खासदार लागतात परंतु भाजपाने अब की बार ४०० पार चा नारा दिला आहे. ४०० जागांवर विजय मिळवण्यामागचा भाजपाचा हेतू दोन तृतियांश बहुमत मिळवणे व त्यानंतर डॉ. बाबासाहेबांच्या राज्यघटनेला हात घालून ते बदलणे हा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना बदलल्यानंतर आरएसएसचा मनुवादी अजेंडा लागू होईल. भाजपाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी भिमशक्तीने महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचा ठराव पास केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना वाचवणे हे आंबेडकरी जनतेची जबाबदारी आहे. काँग्रेस पक्ष राज्यघटना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. खासदार राहुल गांधी यांनी राज्यघटना व लोकशाही वाचवण्यासाठी देशभर पदयात्रा काढून जनजागृती केली आहे. भाजपाचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी भिमशक्तीचे कार्यकर्ते दलित समाजात जनजागृती करतील, घरोघरी जातील, तालुका, जिल्हा, गावा-गावात जातील.

ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आदरच आहे परंतु राज्यघटना वाचवण्यासाठी आंबेडकरी जनतेने एकत्र आले पाहिजे. वंचित बहुजन आघाडीला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जेवढी मते मिळाली होती तेवढी मते विधानसभा निवडणुकीत मिळाली नाहीत. या दोन निवडणुकीत त्यांच्या मतांमध्ये मोठी घसरण झाली आहे. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस आघाडीला फटका बसेल असे वाटत नाही असेही चंद्रकांत हंडोरे म्हणाले.

भिमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत भिमशक्तीचे कार्याध्यक्ष व नाशिकचे माजी महापौर अशोक दिवे, भिमशक्ती मध्य प्रदेशचे अध्यक्ष सुनिल बोरसे, गोवा प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर वारखेडकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष दिनकर ओकार, उपाध्यक्ष नामदेव पिंपळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष शशिकांत बनसोडे, सरचिटणीस गोपाळराव नेत्रपाळे, सरचिटणीस रवी सोनकांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

राष्ट्रपतींच्या हस्ते पहिल्या स्वदेशी ‘सीएआर- टी’ पेशीवर आधारित उपचार प्रणालीचे लोकार्पण

भारताच्या पहिल्या जनुकीय उपचार प्रणालीची सुरुवात ही कर्करोगाविरुध्दच्या लढ्यातील मोठी प्रगती आहे. ‘सीएआर-टी सेल उपचार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *