Breaking News

अजित पवार यांच्याकडून पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांचा आढावा खडकवासला धरण परिसरातील सांडपाण्यावर प्रक्रिया न करणाऱ्या हॉटेलवर कारवाई करावी

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांचा आढावा घेतला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाणी आणि कचऱ्यावर प्रक्रिया न करणाऱ्या खडकवासला धरण परिसरातील हॉटेल आणि रिसॉर्टवर कारवाई करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त महेश पाटील, मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावातून धरणात येणाऱ्या अशुद्ध पाण्याबाबत माहिती घेतली. धरण परिसरात असलेल्या गावातून येणाऱ्या सांडपाण्यासाठी भूमिगत गटार आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करावा. धरण परिसरातील २४ गावातील सांडपाणी व कचरा व्यवस्थापनाबाबत पीएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. विभागीय आयुक्तांनी स्वतंत्र बैठक घेऊन तात्काळ करावयाच्या उपाययोजनांची रुपरेषा तयार करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाच्या सद्यःस्थितीबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. रस्त्याच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी. पिसोळी गावापासून रस्ता रुंदीकरणाबाबतही कार्यवाही करावी. शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयीन वेळ लक्षात घेऊन सकाळी आणि संध्याकाळी २-२ तास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील जड वाहतूक बंद ठेवावी,असे निर्देश अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारकाबाबत माहिती घेतली. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रश्नाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दापोडी-निगडी कॉरिडॉरचा आढावा

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. दीर्घकाळ शहरासाठी उपयुक्त असणाऱ्या कामांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

यावेळी आमदार अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य अभियंता अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी-निगडी कॉरिडॉर प्रकल्पाची माहिती घेतली. ते म्हणाले, रस्त्याच्या बाजूला दोन झाडांच्यामध्ये अधिक जागा असल्यास तेथे वृक्षारोपण करावे, प्रामुख्याने स्थानिक प्रजातीची झाडे वापरावी. पदपथाच्या बाजूला असणारी हिरवळ आणि फुलझाडांचे नीट जतन होईल याचे सुरुवातीपासून नियोजन करावे.

पदपथावर आलेले अतिक्रमण काढण्यात यावे. तसेच कामादरम्यान रस्त्याच्या बाजूला होणारे अतिक्रमण तात्काळ काढावे. पूल आणि मेट्रोमार्ग परिसरात सुशोभीकरण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. कामांची देखभाल दुरुस्ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी उत्तम दर्जाची सामुग्री वापरावी, अशी सूचना त्यांनी केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, झोपडपट्टी पुनर्विकास, शहरातील अतिक्रमण काढणे आदीविषयी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती घेतली. पवना धरण भरले असले तरी आतापासून पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.

पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका रुग्णालयात औषधे, मनुष्यबळ, आरोग्य सुविधांमध्ये त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.

आयुक्त सिंह यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाविषयी माहिती दिली. दापोडी-निगडी कॉरिडॉर १२ किलोमीटर लांबीचा असून त्यात विविध प्रकारच्या सुविधांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

१६ ते २५ फेब्रुवारीदरम्यान खादी, सिल्क आणि विविध मराठमोळ्या खाद्यपदार्थांची मेजवानी

स्वातंत्र्यपूर्व काळात देशातील जनतेला एका धाग्याने बांधण्याचे आणि स्वदेशीचा स्वाभिमान मनामनात जागवण्याचे काम खादी या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *