Breaking News

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यपालांनी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना समज द्या… तर लाठिमार प्रकरणी गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची अंबादास दानवे यांची मागणी

सरकारी कार्यक्रमासाठी लाठीचार्ज झाला. आम्ही अडीच वर्षे सरकारमध्ये होतो. त्यामुळे पोलिस स्वताहून लाठीचार्ज करत नाहीत. मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांकडून आदेश आल्याशिवाय पोलिसांकडून काम केले जात नाही. तरीही शांततेत मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठिमार करण्यात आला. हा लाठिमार गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरच करण्यात आल्याने राज्यपालांनी घटनाबाह्य मुंख्यमंत्र्यांना समज द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे निवदेनाद्वारे केली.

तर विधान परिषदेतील नेते अंबादास दानवे यांनीही आंदोलकांवरील लाठिमाराची उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.

आज शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने मराठा समाजाच्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठिमार प्रकरणी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. आणि निवेदन दिले.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, मी राज्यपालांना सांगितले की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना समज द्या. हा आदेश कोणी दिला त्याच्यावर कारवाई व्हायला पाहीजे. त्याचबरोबर याप्रकरणी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत हिवाळी अधिवेशनाचे कामकाज कसे ते चालते पहा असे आवाहनही प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

निधी वाटपाबाबत बोलत असताना आदित्य ठाकरे म्हणाले, मला अजून १ रूपया पण आला नाही. माजी नगरसेवकांना आले नाही. आम्ही या विषयावर सविस्तर पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले.
केंद्र सरकारने इंडिया हा शब्द काढून त्याऐवजी भारत हा शब्द वापरण्यास सुरुवात केल्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, हा आमच्या इंडिया बैठकीचा परिणाम आहे. फक्त नाव बदलून होणार नाही. मणिपूर मध्ये अत्याचार झाला ते भारतीय होते. आधी त्या भारतीयांबद्दल बोला. मग नाव बदला अशी मागणीही केली.

दरम्यान, पूर्वी बारसु येथील आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. नंतर पंढरीच्या आषाढी वारीतील वारकऱ्यांवर आणि आता जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर लाठीमार केला. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला व लहान मुलांचा समावेश आहे. निष्पाप महिला व लहान मुलांवरील लाठी हल्ला महाराष्ट्रातील जनता कदापि सहन करणार नाही. आंदोलनकर्ते आणि अधिकारी यांच्यात चर्चा सुरु होती. परंतु कुठूनतरी सुचना आल्या आणि पोलिसांनी अमानुष लाठीमार सुरु केला. त्यामुळे लाठी हल्ला करण्याबाबतच्या सुचना शासनाकडून देण्यात आल्या किंवा पोलिसांनी स्वत: हून लाठी हल्ला केला याबाबत राज्य सरकारने खुलासा करणे आवश्यक आहे. तसेच, ज्यांनी लाठी हल्ल्याचा आदेश दिला त्यांच्यावर कडक कारवाई करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांना दिलेल्या पत्रात अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

मराठा आरक्षण प्रकरणी सरकारच्या वतीने पत्रकार परिषद घेवून लाठीमार झाल्याप्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांनी बिनर्शत माफी मागितली आहे. तथापि, सरकारने केवळ माफी मागून चालणार नाही तर स्वत: च्या हक्कासाठी शांततेने आंदोलन करणाऱ्या निरपराध मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीमार करुन जखमी करणा-या सरकारने नैतिक जबाबदारी स्विकारुन राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत जिल्ह्याच्या जिल्हा पोलिस अधिक्षकास जबाबदार धरुन त्यांना सेवेतुन बडतर्फ करण्यात यावे. या घटनेत महिला, लहान मुले व आंदोलकांवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून सदरचे सर्व गुन्हे राज्य शासनाने बिनशर्त मागे घ्यावे. लाठीहल्याप्रकरणी निवृत्त न्यायाधिशांमार्फत उच्च स्तरीय चौकशी करुन एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात यावे. तसेच, याप्रकरणी दोषी असलेल्या संबंधीत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचेवर कडक कारवाई करण्यात यावी. याबाबत कारवाई करण्याबाबत आपण राज्य सरकारला निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर,आ.अजय चौधरी, आ.सुनील प्रभू, आ.ॲड.अनिल परब,आ. रविंद्र वायकर, आ.रमेश कोरगावकर, आ.प्रकाश फापर्तेकर, आ.सुनील शिंदे, आ. ऋतुजा लटके, आ.सचिन अहिर, आ.विलास पोतनीस, आ.कैलास पाटील, आ.राहुल पाटील, जिल्हाप्रमुख राजू राठोड व समनव्यक शरीफ देशमुख उपस्थित होते.

Check Also

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *