Breaking News

आधुनिक तंत्रज्ञानामुळे हृदयरोग निदान व उपचार क्षेत्रात क्रांतिकारी बदल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईत हृदयविकार विषयक जागतिक परिषदेला सुरुवात

कार्डियाक इमेजिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हृदयरोग निदान व उपचारामध्ये क्रांतिकारी बदल झाले असून लाखो लोकांना त्यामुळे जीवनदान मिळत आहे तसेच रुग्णांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारत आहे. मात्र २० – ३० वयाच्या युवकांमध्ये दिसून येणारे हृदयविकार ही चिंतेची बाब असून, ते थांबविण्यासाठी हृदयविकार तज्ज्ञांनी समाजाला मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

‘कार्डियाक इमेजिंग व क्लिनिकल कार्डिओलॉजी’ या विषयावरील तिसऱ्या जागतिक परिषदेचे उदघाटन राज्यपाल बैस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 6) हॉटेल ग्रँड हयात, सांताक्रुझ मुंबई येथे पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

उदघाटन सत्राला अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि अणुशास्त्रज्ञ दिनेश कुमार शुक्ला, कार्डियाक इमेजिंग वर्ल्ड काँग्रेसचे अध्यक्ष डॉ सी एन मंजुनाथ, वर्ल्ड फेडरेशन ऑफ कार्डियाक इमेजिंग अँड क्लिनिकल कार्डिओलॉजीचे अध्यक्ष डॉ जी एन महापात्रा, इंदूरच्या श्री अरबिंदो इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संस्थापक डॉ विनोद भंडारी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यपाल रमेश बैस पुढे म्हणाले, इमेजिंग सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धती सामान्य रुग्णांकरिता खर्चिक असतात. अशा चाचण्यांसाठी लागणारी वैद्यकीय उपकरणे बहुतांश विदेशात तयार होतात व ती महागडी असतात. त्यामुळे आधुनिक वैद्यकीय उपकरणे देशात तयार झाली, तर इमेजिंग चाचण्यांचा खर्च कमी होईल. तसेच हृदयरोग व त्यासाठी लागणारा रोगनिदान खर्च आयुष्मान भारत सारख्या योजनेतून मिळाला तर त्याचा गरीब कुटुंबांना मोठा फायदा होईल.

वीस – तीस वर्षांचे तरुण जिममध्ये व्यायाम करताना किंवा कामाच्या ठिकाणी अचानक कोसळल्याचे बातम्यांमध्ये पाहतो, तेंव्हा अतिशय दुःख होते, असे सांगून हृदयविकार नियंत्रणात आणण्यासाठी तज्ज्ञांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्यपाल बैस यांनी केले.
इमेजिंग तंत्रज्ञानातील प्रगती, कृत्रिम प्रज्ञा व आयुष्मान भारत सारख्या सर्वसमावेशक योजनांमुळे लाखो लोकांचे जीवनमान उंचावेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या ताज्या अहवालानुसार सन २०५० पर्यंत भारतात वरिष्ठ नागरिकांची संख्या ३४.७ कोटी इतकी असेल. या दृष्टीने नागरिकांना पुरेशा प्रमाणात हृदयरोग चिकित्सा सुविधा देण्यासाठी तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे. तसेच ग्रामीण भागातील रुग्णांनादेखील आधुनिक चिकित्सेचा लाभ होईल. यादृष्टीने टेली मेडिसिन व टेली रेडिओलॉजीचा कसा वापर करता येईल, याबाबत विचार विनिमय करावा, अशी सूचना राज्यपाल बैस यांनी केली.

हवेतील प्रदूषण, ताणतणावांमुळे हृदयरोग वाढत आहे : डॉ मंजूनाथ

जीवनशैली आजारांच्या बाबतीत भारतात गंभीर परिस्थिती असून हृदयविकार रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग व अलीकडच्या काळात स्क्रीन ऍडिक्शन वाढत आहे. हृदयरोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक- तृतीयांश चाळीशीच्या आतील व्यक्तींचे होत आहेत. वाढत्या हृदय विकारांमागे हवेतील प्रदूषण हे देखील एक कारण असल्याचे समोर आले आहे, असे वर्ल्ड काँग्रेसचे अध्यक्ष व हृदयरोग तज्ज्ञ डॉ सी आर मंजूनाथ यांनी यावेळी सांगितले.

पूर्वी शहरातील व विशेषतः संपन्न लोकांना होणारे हृदयविकार आज गरीब, कामगार व गावकऱ्यांनादेखील होत आहे. लहान मुलांची झोप नीट व्हावी व मुलांची तयारी करताना पालकांचासुद्धा ताणतणाव कमी व्हावा, यासाठी मुलांच्या शाळा साडेदहा पासून सुरु करणे चांगले होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी राज्यपाल रमेश बैस यांच्याहस्ते ‘कार्डियाक इमेजिंग अपडेट – 2023’ या पुस्तकाचे तसेच परिषदेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

राज्यात एकूण ११ हजार ५०२ सोनोग्राफी केंद्र: तक्रारदारास १ लाख रुपयांचे बक्षिस

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यांतर्गत राज्य सल्लागार समितीची बैठक पुणे येथील सहसंचालक कार्यालयात दूरदृश्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *