Breaking News

मेसन व्हॉल्व्ह इंडियाचा आयपीओ आज उघडला, किंमत बँडसहीत इतर तपशील जाणून घ्या गुंतवणूकदारांना कमाईची संधी

आयपीओ गुंतवणूकदारांना कमाईची संधी उपलब्ध झाली आहे. पुणेस्थित व्हॉल्व्ह पुरवठादार कंपनी मेसन व्हॉल्व्ह इंडियाचा आयपीओ आज म्हणजे ८ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडला आहे. या आयपीओमध्ये कंपनी ३०.४८ लाख नवीन शेअर्सच्या विक्रीतून ३१.०९ कोटी रुपये उभारणार आहे.

कंपनीने या आयपीओसाठी प्रति शेअर १०२ रुपये किंमत बँड आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये १२ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येईल. आयपीओचा अर्धा भाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव आहे आणि उर्वरित ५० टक्के उच्च निव्वळ मूल्य असलेल्या वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी म्हणजे प्रत्येकी १४.४६ लाख शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १,२०० शेअर्ससाठी गुंतवणूक करावी लागेल. याचा अर्थ गुंतवणूकदारांना किमान १,२२,४०० रुपये गुंतवावे लागतील.

आयपीओतून मिळालेल्या निधीतून कंपनी ११.३७ कोटी रुपयांचा निधी प्लांट आणि मशिनरी खरेदीसाठी वापरणार आहे. तसेच ११.९५ कोटी रुपये खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी वापरण्यात येणार आहेत. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी आणि संबंधित खर्चासाठी वापरण्यात येणार आहे.

आयपीओ यशस्वी झाल्यानंतर गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप १५ सप्टेंबर रोजी होईल. अयशस्वी गुंतवणूकदारांसाठी परतावा प्रक्रिया १८ सप्टेंबरपासून सुरू होईल. तर २० सप्टेंबर रोजी यशस्वी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतरित केले जातील. शेअर बाजारात मेसन व्हॉल्व्ह इंडियाच्या शेअर्सचे लिस्टींग २१ सप्टेंबर रोजी होईल. शेअर्स बीएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील.

मेसन व्हॉल्व्हस इंडिया लिमिटेड ची स्थापना २०१६ मध्ये झाली. कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उद्योगांना झडपा, अॅक्ट्युएटर, स्ट्रेनर्स आणि रिमोट-कंट्रोल व्हॉल्व्ह सिस्टम पुरवते. मेसन व्हॉल्व्ह इंडिया व्हॉल्व्ह, ऍक्च्युएटर, रिमोट कंट्रोल सिस्टीम, कंट्रोल कॅबिनेट, टँक, व्हिज्युअलायझेशन सिस्टम, पाइपिंग, पंप, फिटिंग्ज, गॅस्केट यांसारखी उत्पादने असेंबलिंग, खरेदी, विक्री, वितरण, आयात आणि निर्यात करते. कंपनीचे उत्पादन युनिट महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेडमधील भांबोली येथे आहे. डेन्मार्क, जर्मनी, पोलंड, दक्षिण कोरिया, नेदरलँड्स, स्वीडन, तुर्की आणि यूएई सारख्या देशांतून आणि गोवा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, दादरा आणि नगर हवेली, दिल्ली आणि तेलंगणातून पुढील असेंब्ली आणि पुरवठ्यासाठी उत्पादने खरेदी करते.

Check Also

जागतिक युध्दसदृष्य परिस्थितीमुळे भारतीय निर्यातीवर परिणाम ३.१ टक्क्याने भारतीय मालाची निर्यात घटली

जागतिकस्तरावर भौगोलिक-राजकीय युध्दसदृष्य संघर्ष, जागतिक मागणीतील घट आणि वस्तूंच्या किमतीतील घसरण यांचा भारताच्या परकीय व्यापारावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *