Breaking News

भारतीय अर्थव्यवस्था वेगात, जून तिमाहीत जीडीपी ७.८ टक्क्यांवर जगातील कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत हा सर्वात वेगवान विकास दर आहे.

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार सुरुवात केली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेने पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ नोंदवली आहे. जगातील कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत हा सर्वात वेगवान विकास दर आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) ने गुरुवारी संध्याकाळी पहिल्या तिमाहीतील जीडीपीची आकडेवारी जाहीर केली. यापूर्वी कोअर सेक्टरची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती, त्यानुसार कोअर सेक्टरचा विकास दर जुलैमध्ये ८ टक्क्यांवर आला आहे. महिन्यापूर्वी जूनमध्ये ही दर ८.३ टक्के होता.

एनएसओ डेटानुसार, भारताचा जीडीपी वाढीचा दर एका वर्षापूर्वी याच तिमाहीत म्हणजेच जून २०२२ च्या तिमाहीत १३.१ टक्के होता. त्या तुलनेत यंदा विकासदरावर परिणाम झाला आहे. पहिल्या तिमाहीत कृषी क्षेत्राचा विकास दर ३.५ टक्के होता, तर बांधकाम क्षेत्राचा विकास दर ७.९ टक्के होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्राने निराशा केली. या क्षेत्राचा विकास दर ४.७ टक्क्यांवर आला.

जूनच्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली राहील, अशी अनेक विश्लेषकांची अपेक्षा होती. रिझर्व्ह बँकेने पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ८ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. याचा अर्थ पहिल्या तिमाहीत विकास दर रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा थोडा कमी झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या चार तिमाहींमध्ये देशाचा आर्थिक विकास दर अनुक्रमे ८ टक्के, ६.५ टक्के, ६ टक्के आणि ५.७ टक्के असू शकतो. अशा प्रकारे, आरबीआयने संपूर्ण चालू आर्थिक वर्षासाठी ६.७ टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त केला आहे.

अलीकडेच अनेक संस्थांनी भारताच्या विकास दराच्या अंदाजात सुधारणा केली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने यापूर्वी २०२३ साठी विकास दर ५.९ टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला होता, जो नंतर सुधारित करून ६.१ टक्के करण्यात आला. नाणेनिधीने २०२४ मध्ये विकास दर ६.३ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. फिच रेटिंगने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी विकास दराचा अंदाज ६ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

यापूर्वी मार्च २०२३ तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने ६.१ टक्के वाढ नोंदवली होती. तर संपूर्ण आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशाचा आर्थिक विकास दर ७.२ टक्के होता. गेल्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. रिझर्व्ह बँकेने गेल्या आर्थिक वर्षात विकास दर ७ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

जगात भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेचा जून तिमाहीत २.१ टक्के दराने वाढ झाली. हा दर तिमाही आधारावर आहे. तर दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनने जून तिमाहीत वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ६.३ टक्के वाढ नोंदवली. यूकेची अर्थव्यवस्था जून तिमाहीत ०.४ टक्के दराने वाढली, तर जर्मनी ०.२ टक्के वाढीसह मंदीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. जून तिमाहीत जपानचा विकास दर वार्षिक आधारावर ६ टक्के होता.

Check Also

केंद्रीय अर्थसंकल्पात कर कपातीमुळे या वस्तू स्वस्त तर त्या होणार महाग अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली घोषणा

केंद्रातील एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचा सातवा अर्थसंकल्प सादर केला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *