मुंबई : ‘द कश्मिर फाईल्स’ चित्रपटाला संपूर्ण देशभरात घवघवीत यश मिळाल्यानंतर या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलेल्या लसीचा प्रवास दाखवला आहे. कोविड काळात भारतीय लसीला संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती तसेच अनेकांचे प्राण वाचवण्यातही मोलाची भूमिका भारतीय बनावटीच्या कोविशील्ड लसीने बजावली होती.
‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटात अभिनेते नाना पाटकेर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही.अक्षरश प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली होती, अशातच सिंघम चित्रतात जयकांत शिकरे या पात्राची दमदार भूमिका साकारणारे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी नाना पाटेकरांच्या संवादाची क्लिप ट्विटरवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटातील एक संवाद सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या संवादामध्ये फक्त विज्ञानाच्या आधारेच करोनाची लढाई जिंकली जाईल असे म्हटले आहे. हिच पोस्ट प्रकाश राज यांनी पुन्हा पोस्ट केली आहे. ‘जर असे होते, तर मग थाळ्या वाजवा, घंटा बडवा, टाळ्या वाजवा, गो करोना गो हे कुणी सांगितले होते?’ असे प्रकाश राज म्हणाले.
काय आहे व्हिडीओमध्ये संवाद?
या क्लिपमध्ये नाना पाटेकर बोलताना दिसत आहेत की, “माझे पंतप्रधानांशी बोलणे झाले आहे. त्यांनी म्हटले आहे की हे युद्ध विज्ञानाच्या आधारेच जिंकू शकतो. तुमच्याकडे लोक बरेच टोटके वगैरे घेऊन येतील, मात्र तुमचे निर्णय विज्ञानावर आधारितच असले पाहिजेत असा संवाद या व्हिडिओ मध्ये दिसून येतो. मात्र प्रकाश राज यांनी केलेल्या ट्विटनंतर त्यांना चांगलंच ट्रोलिंगच सामना करावा लागला आहे.
सोशल मीडियावर प्रकाश राज यांची पोस्ट व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे. एका यूजरने ‘ज्या देशाच्या थाळीत खातात त्याच थाळीत छेद करत आहात, प्रकाश राज हा खऱ्याखुऱ्या आयुष्यातही खलनायाकच आहेत’ असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने ‘तुम्ही सतत भाजपावर टीका का करता’ असे म्हटले आहे.