Breaking News

हसविणारा भाऊ आता भीती दाखविणार ओढ मध्ये दिसणार खलनायकाच्या भूमिकेत

मुंबई : प्रतिनिधी

आपल्यालाही नेहमीपेक्षा वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं, पण फार कमी कलाकारांचं हे स्वप्न साकार होतं. काही कलाकार एकाच पठडीतील भूमिकांच्या जाळ्यात अडकून राहतात; परंतु काही भाग्यवान कलावंत मात्र पठडीबाज भूमिकांचे पाश तोडण्यात यशस्वी होतात. छोट्या पडद्याच्या माध्यमातून अभिनेता भाऊ कदमचं नाव आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाबाहेरही गाजतंय. आजवर विनोदी भूमिकांमध्ये समोर आलेले भाऊ कदम ‘ओढ’ या आगामी मराठी चित्रपटात खलनायकी भूमिकेत दिसणार आहे.

सोनाली एन्टरटेन्मेंट हाऊसची प्रस्तुती तसंच एस. आर. तोवर यांची निर्मिती असलेल्या ‘ओढ’या चित्रपटात आजवर कधीही न दिसलेलं भाऊचं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीपासून हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंतचा आजवरचा इतिहास पाहिल्यास आघाडीच्या बऱ्याच नायकांनी आपल्या कारकिर्दीत खलनायकी भूमिका रंगविल्या आहेत. ‘ओढ’च्या निमित्ताने भाऊला ही संधी लाभली आहे. दिग्दर्शक नागेश दरक यांच्या या सिनेमात भाऊने भाऊसाहेब देवकर नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘ओढ’मधील भाऊ महिला स्वयंसेवी संस्थाचालक आहे. आजतागायत केवळ विनोदी भूमिका साकारल्यानंतर भाऊला जेव्हा ‘ओढ’साठी खलनायकाची ऑफर आली, तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता होकार दिला. याबाबत भाऊ म्हणाला की, नागेश दरक यांच्यासारख्या मातब्बर दिग्दर्शकांच्या सिनेमातील खलनायकी भूमिका आपल्यातील कलावंताचं नवं रूप जगासमोर आणणारी असल्याचं व्यक्तिरेखा ऐकल्यावर जाणवलं. मनाला भिडणारं तसंच प्रवाहापेक्षा वेगळं कथानक आणि भाऊसाहेब देवकरच्या भूमिकेच्या मी जणू प्रेमातच पडलो. त्यातून जो खलनायक साकारला तो ‘ओढ’मध्ये दिसणार आहे. हा खलनायक प्रेक्षकांनाही आवडेल यात शंका नाही.

‘ओढ’ या शीर्षकावरून चित्रपटात एखादी प्रेमकथा पाहायला मिळेल असं जाणवतं, पण तसं काहीही नसून यात निखळ मैत्रीची गोष्ट पाहायला मिळणार आहे. कथा व पटकथा दिनेशसिंग ठाकूर यांनी लिहिली असून, त्यांनीच गणेश कदम आणि दर्शन सराग यांच्यासोबत संवादलेखन केलं आहे. गणेश तोवर, उल्का गुप्ता, मोहन जोशी, भारत गणेशपुरे, शशिकांत केरकर, जयवंत भालेकर, राहुल चिटनाळे, आदित्य आळणे, सचिन चौबे, शीतल गायकवाड, तेजस्विनी खताळ, मृणाल कुलकर्णी आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. १९ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं छायांकन रविकांत रेड्डी यांनी केलं आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *