Breaking News

रमेश देव यांच्यापाठोपाठ सीमा देव यांचीही दिडवर्षात एक्झीट दोन देवांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी झाली पोरकी

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एका देवाच्या जाण्यानंतर दुसऱ्या देवने एक्झीट घेतल्याने मराठी हिंदी चित्रपटसृष्टी शोकाकूल झाली. वास्तविक पाहता चित्रपटसृष्टीत आणि खऱ्या सामाजिक आयुष्यातही अनेक प्रेम विवाह अपयशी ठरत असताना रमेश देव आणि सीमा देव यांच्यातील प्रेम विवाह टीकलेच नाही तर त्याने शेवटही गाठल्याचे सीमा देव यांच्या मृत्यूने दाखवून दिले. साधारणतः दिडवर्षापूर्वी राज्यातील रमेश देव यांचे निधन झाले. त्यांच्या पाठोपाठ सीमा देव यांनीही आज वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांच्यावर संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात उल्लेखनीय काम करत नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांनी जवळपास ८० हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले होते. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या जवळपास वर्षभर त्या वयोमानानुसार आजारी होत्या. शिवाय त्यांना अल्झायमर या आजाराचेही निदान झाले होते. तसेच गेल्या काही काळापासून सीमा त्यांचा मुलगा तथा दिग्दर्शक अभिनय देव यांच्यासोबत मुंबईतील वांद्रे याठिकाणी राहत होत्या.
सीमा देव यांचे माहेरचे नाव नलिनी सराफ असे होते. मुंबईतल्या गिरगावात त्यांचे बालपण गेले. त्याने सिनेसृष्टीत प्रवेश केला तेव्हा दुर्गा खोटे, सुलोचना, ललिता पवार या अभिनेत्रींनी महिलांसाठी अभिनय क्षेत्रात वाट दाखवण्यास सुरुवात केली होती. मात्र तरीही सीमा यांच्यासाठी प्रवास सोपा नव्हता. समाजाची बोलणी आणि नजरा यावर मात करत त्या पुढे आल्या. शाळेत असल्यापासूनच सीमा देव यांना नृत्याची आवड होती आणि ती त्यांनी जोपासलीही. कल्याणजी-आनंदजींपैकी आनंदजींच्या ऑर्केस्ट्रामध्ये त्या गाणं गायच्या. मात्र सारस्वत गौड समाजातील मुली-महिलांनी गाणे-बजावणे करणे त्यावेळी अपराध मानला जायचा. मात्र त्यांनी तरीही मागे वळून पाहिले नाही. सीमा देव हे मराठी नाव हिंदी सिनेसृष्टीतही गाजवले.

रमेश देव आणि सीमा देव ही प्रेक्षकांची अत्यंत आवडती जोडी होती. या दोघांनी मिळून एक काळ गाजवला होता. रमेश हे सीमा यांच्याहून १२ वर्षांनी मोठे होते. तर सीमा यांचं खरं नाव नलिनी सराफ होतं. सीमा यांनीही मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरूवात केली होती. मात्र पडद्यावर त्यांनी त्यांचं नाव सीमा ठेवलं. ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटावेळेस त्यांची भेट झाली आणि त्यांच्या प्रेमकहाणीची सुरुवातही तिथूनच झाली. ‘वरदक्षिणा’ या चित्रपटात सीमा यांचं लग्न दुसऱ्या व्यक्तीशी लावून देण्यासाठी रमेश यांना मदत करायची होती. मात्र हे सगळं करत असताना तेच सीमा यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. तेव्हापासून सीमा यांनी रमेश यांची साथ कधीही सोडली नाही.
मात्र रमेश यांच्या निधनानंतर सीमा एकटे पडल्या. नवऱ्याचा विरह सहन न झाल्याने त्या मानसिकरित्या खचल्या होत्या. त्यांना आजारांनी ग्रासलं होतं. पतीला सोडून कधीही न राहिलेल्या सीमा यांनी अखेर या जगाचा निरोप घेतला. प्रेम प्रेम म्हणजे काय हे रमेश आणि सीमा देव यांच्याकडून शिकावं असं सिनेसृष्टीत मोठ्या अभिमानाने म्हटलं जातं. आज त्यांच्या निधनानंतर त्यांचे अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

१९५७ साली ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी पदार्पण केले. आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला हे त्यातले काही उल्लेखनीय चित्रपट. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या भूमिका असलेल्या हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ सिनेमातील त्यांची भूमिका छोटी परंतु संस्मरणीय राहिली.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा, ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीला विशेष अनुदान ८९ मराठी चित्रपटांना आर्थिक अनुदानाचे वितरण

दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय आणि मराठी चित्रपट निर्माण केला. त्या चित्रपटासारखे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *