Breaking News

आता डॉ. आंबेडकर स्मारकाच्या उंचीवरून वादंगाचे राजकारण आठवले यांच्या नंतर आनंद आंबेडकर यांनाही आक्षेप

मुंबई: प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या उंचीचा वाद ताजा असतानाच आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उंचीवरून देखील राजकिय वादंग निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी या स्मारकाच्या उंचीवर सर्वप्रथम आक्षेप घेतल्यानंतर आता रिपब्लिकन सेनेचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी ही या नियोजित स्मारकाच्या उंचीवरून नव्याने आऱोप केल्याने आता वादंगाचे राजकारण सुरू झाले आहे.
वांद्रयाच्या एमएमआरडीए कार्यालयात नुकतीच स्मारकाचे शिल्पकार राम सुतार, वस्तू विशारद शशी प्रभू आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीनंतर स्मारकाच्या उंची बाबत रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली होती. सरकारने पुन्हा या स्मारकाच्या उंचीबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी आठवले यांनी केली होती. त्याचबरोबर आनंदराज आंबेडकर यांनीही बुधवारी आंबेडकर स्मारकाला विरोध केला आहे. दोन दिवसांपूर्वी इंदू मिलच्या नियोजित जागेवर स्मारकाचे वास्तूविशारद आणि काही अधिकाऱ्यांच्या उपस्तिथीत नियोजित स्मारकाचे आनंदराज आंबेडकर यांच्या मुख्य उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले. यावेळी नियोजित स्मारकात मुख्य पुतळ्याची उंची ३५० फुटांची ठरवण्यात आली होती. मात्र आता चबुतरा १०० फूट आणि मुख्य पुतळ्याची उंची २५० फूट करण्यात आल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
अमेरिकेतील प्रसिद्ध ” स्टॅचू ऑफ लिबर्टी “च्या धर्तीवर हे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याची आंबेडकरी अनुयायांची इच्छा आहे . सरकारने पुतळ्याची उंची कमी न करता हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक करावे अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे . अनुयायांच्या या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. नियोजिय स्मारकाच्या नव्या सादरीकरणात मध्यभागी बाबासाहेबांचा २५० फूट उंच ब्रॉन्झचा पुतळा तर पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची १०० फूट आहे. या चबुतऱ्यामध्ये ग्रंथालय, सभागृह, कलादालन असणार आहे. पुतळ्याचा चबुतऱा कमळाच्या फुलाच्या उभा असे डिझाईन बनवण्यात येणार आहे. पुतळ्याच्या चबुतऱ्याच्य तळात वस्तुसंग्राहालय असणार आहे. तब्बल आठ हॉल असलेल्या या वस्तुसंग्राहलयात बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत सर्व पैलु चित्रांकीत करण्याला येणार आहेत. या आंतरराष्ट्रीय स्मारकास भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येण्याची शक्यता गृहीत धरुन ४५० वाहनांसाठी पार्कींग व्यवस्था तळघरात करण्याला येणार आहे. बाबासाहेबांच्या संघर्षाचा इतिहास पाहता इंदु मिलमध्ये असणाऱ्या तळयावर महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष प्रारूप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे .
दरम्यान नियोजित आंतरराष्ट्रीय स्मारकाची एकूण उंची याबाबत अद्याप सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले नाही. मात्र मुख्यमंत्री लवकरच याचा खुलासा करतील असे नगरविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *