Breaking News

नाना पटोले म्हणाले, भारत जोडो न्याय यात्रेचा महाराष्ट्रात ४७९ किमीचा प्रवास

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेला देशभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. आता १४ जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा सुरु होत आहे. भारत जोडो यात्रेतून देश जोडण्याचे जे काम झाले तेच काम या यात्रेतूनही होणार असून जनतेच्या न्याय हक्काला वाचा फोडण्याचे काम या यात्रेतून होईल. भारत जोडो न्याय यात्रेलाही जनतेचा मोठा प्रतिसाद मिळेल व देशातील वातावरण ढवळून निघेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसंदर्भात दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात बैठक झाली या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो यात्रेने देश तोडणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. या यात्रेतून राहुल गांधी यांनी सर्व समाज घटकांच्या वेदना, समस्या व त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. आता पुन्हा मणिपूरपासून १४ जानेवारीला भारत जोडो न्याय यात्रा सुरु होत आहे. ही यात्रा ६६ दिवस, ११० जिल्हे ६७१३ किलोमीटरचे अंतर पार करणार असून महाराष्ट्रात मालेगाव, नाशिक, ठाणे, मुंबई असे ५ दिवस, ६ जिल्हे व ४७९ किमीचा प्रवास करणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा यशस्वी करण्यासंदर्भात दिल्लीतील बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

जागा वाटपावर महाविकास आघाडीत मतभेद नाहीत..

लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झालेली नाही. जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीत कसलेही मतभेद नसून शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याशी यासंदर्भात चर्चा झालेली आहे. जागा वाटपासंदर्भात सर्वात मोठी आग तर महायुतीत लागलेली आहे ती निवडणुकीत समोर येईल. जागा वाटपासदंर्भात मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली असून दोन चार दिवसात या समितीच्या बैठका होतील.

भाजपाचा २०२४ च्या निवडणुकीत पराभव..

भारतीय जनता पक्ष घाबरलेला असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे सरकार पुन्हा केंद्रात येणार नाही. भाजपा सरकारने त्यांचे दोन कार्यकर्ते ईडी व सीबीआयला कामाला लावलेले आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले त्यांना भाजपाने पक्षात घेऊन वॉशिंग मशिनमधून स्वच्छ केले आहे. ईडी व सीबीआयच्या माध्यमातून विरोधकांना घाबरवण्याचे काम मागील १० वर्षापासून सुरु आहे पण देशातील जनता त्यांचा हा डाव ओळखून आहे. भाजपाने काहीही केले तरी २०२४ च्या निवडणुकीत ते पुन्हा सत्तेत येणार नाहीत, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *