Breaking News

पत्रकारतेतील दिनू रणदिवे नामक धडाडीचा आवाज बंद झाला वयाच्या ९५ व्या वर्षी निधन

मुंबई: प्रतिनिधी
मुंबईसह राज्यातील नामवंत आणि आदराने नाव घेणाऱ्यांच्या पत्रकारांच्या यादीतील ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे आज सकाळी वयाच्या ९५ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. पत्रकारातेतील निवृत्तीनंतरही अनेक अन्यायकारक घटनांना आपल्या स्वतंत्र बाण्याच्या पत्रकारी वृत्तीने आवाज फोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांनी नेहमीच दलित, वंचित, उपेक्षितांच्या आवाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या आणि धडाडीच्या पत्रकारांमध्ये मुख्य क्रमाने त्यांचं नाव घेतलं जातं. दिनू रणदिवे यांचा जन्म १९२५ मध्ये झाला. १९५६ मध्ये त्यांनी पत्रकारिता करण्यास सुरुवात केली. दलित, उपेक्षित, वंचित यांचे प्रश्न त्यांनी कायमच मांडले. त्यांच्या समस्यांसाठी ते कायमच झगडत राहीले.
१९५५ मध्ये समाजवादी पक्षाने पुकारलेल्या गोवा मुक्तीसंग्रामात दिनू रणदिवे सक्रिय होते. तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सहभाग होता. या लढ्यात त्यांनी आचार्य अत्रे यांच्यासोबत तुरुंगवासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ मध्ये संयुक्त महाराष्ट्र पत्रिका या नावाचे अनियतकालिक सुरु केले. रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली ती इथूनच. त्यानंतर ते दीर्घकाळ महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत होते. १९८५ मध्ये ते महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त झाले. १९७२ मध्ये त्यांनी केलेलं बांगलादेश मुक्ती लढ्याचंही वार्तांकन गाजलं होतं . मुंबई प्रेस क्लबचा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते.
मराठी ई-बातम्या.कॉम या आपल्या संकेतस्थळाचे त्यांच्याच हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. महिन्याभरापूर्वीच दिनू रणदिवे यांच्या पत्नीचे निधन झाले होते. आज त्यांचीही प्राणज्योत मालवली.

Check Also

१०४ वर्षांच्या आज्जींनी बजावला गृह मतदानाचा हक्क

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाचा पर्याय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *