शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक स्व.विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी विनायक मेटे यांचा राजकिय वारसा चालविण्याची इच्छा व्यक्त करत लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु ज्योती मेटे या कोणत्याही राजकिय पक्षाच्या सदस्या नव्हत्या. या सगळ्या घडामोडीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता जारी करण्यात आली. त्यामुळे अखेर निवडणूकीच्या रिंगणातून राजकारणात प्रवेश करण्याच्या दृष्टीने ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यांच्या बैठकीतील चर्चेचा तपशील अद्याप बाहेर आलेला नसला तरी ज्योती मेटे यांच्या उमेदवारीबाबत शरद पवार सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे.
मागील जवळपास ४ वर्षाहून अधिक काळ राज्यातील भाजपाच्या राजकारणातून काहीशा बाहेर फेकलेल्या माजी मंत्री आणि भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना महाराष्ट्रातून बाहेर काढून पहिल्यांदाच विधानसभेऐवजी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी जाहीर करत राज्यातील महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पंकजा मुंडे या ना खुष असल्याचे बोलले जात आहे. जर पंकजा मुंडे या लोकसभेवर गेल्या तर त्यांच्या भगिनी तसेच विद्यमान खासदार डॉ प्रितम मुंडे यांच्या राजकिय पुर्नवसनाचा प्रश्न निर्माण होत आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे याचे चुलत बंधू तथा आमदार व मंत्री धनंजय मुंडे यांचा बीडच्या राजकारणावरील वरचष्मा वाढत चालला आहे.
राज्याच्या राजकारणात धनंजय मुंडे हे अजित पवार यांचे समर्थक मानले जातात. तसेच मागील निवडणूकीत पंकजा मुंडे यांच्या पराभव करत विधानसभा निवडणूक जिंकली होती. परंतु सध्या ते अजित पवार गटासोबत गेल्याने शरद पवार गटाला धनंजय मुंडे यांचा राजकिय काटा काढायचा आहे. तर दुसऱ्याबाजूला भाजपातील अंतर्गत दुफळीत पंकजा मुंडे यांचे राज्याच्या राजकारणात असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून चांगल्या उमेदवाराची शोधाशोध सुरु केला.
दरम्यानच्या काळात स्व.विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी राज्याच्या राजकारणात उतरण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी सर्वपक्षिय नेत्यांनी ज्योती मेटे यांनी कोणत्याही राजकिय पक्षात प्रवेश केल्यास त्यांना बिनविरोध निवडूण देण्याचे आश्वासनही विनायक मेटे यांच्या श्रध्दांजली सभेत दिले होते. परंतु ज्योती मेटे यांनी शिवसेनेच्या दोन्ही पक्षांच्या गटात जाण्याऐवजी किंवा भाजपात जाण्य़ापेक्षा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत पुणे येथे पवार यांची भेटही घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्योती मेटे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्याऐवजी पुरस्कृत उमेदवारी देण्याचा विचार शरद पवार यांच्याकडून करण्यात येत आहे. शिवाय राज्यात पंकजा मुंडे यांच्यासारख्या महिला नेतृत्वाची गरज असल्याचे सूचक सांगण्यात आले.