एक वेळ असते, कुठे तरी थांबायचं असतं, सरकारी नोकर, उद्योजक यांनी आपल्या तरूणाईच्या हाती पुढील अधिकार सोपवित ज्येष्ठांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत आणि आर्शिवाद देतात. घरी आराम करावा, निवृत्ती घ्यावी पण साहेबांच वय ८२ झालं तरी अजूनही निवृत्ती घ्यायला तयार नाहीत. निवृत्त व्हायचं एक वय असतं. सरकारी कर्मचारी ५८ व्या वर्षी तर भाजपात निवृत्त व्हायचं वय ७५ च्या पुढचं आहे. अशात ८२, ८३ वय झालं तरीही आमचे वरिष्ठ थांबत का नाही? असा प्रश्न अजित पवार यांनी केला होता. त्याला शरद पवारांनी जोरदार उत्तर दिलं आहे. दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे उत्तर दिलं आहे. तसेच निवडणूक आयोगाने ऐकलं नाही तर दुसऱ्या यंत्रणेकडे अर्थात (न्यायालयात) जाणार असल्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले.
शरद पवार म्हणाले, मी कुठेही थांबण्याचा प्रश्नच येत नाही. मी आता आणखी जोमाने काम करणार आहे. वय ८२ होऊ द्या किंवा ९२ होऊ द्या, असं म्हणत अजित पवारांना उत्तर दिलं.
तसेच पुढे शरद पवार म्हणाले, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. दुसऱ्या कुणी काय म्हटलं? त्याला काही अर्थ नाही. कोण काय म्हणतंय त्याच्याशी मला काही करायचं नाही. आजही जी कार्यकारिणी झाली ती माझ्या अध्यक्षतेखाली झाली असंही म्हणाले.
पार्टीला संपवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. आता पक्षाला मजबूतीने उभे करणे आणि चांगल्या स्थितीत आणणे ही मानसिकता आमच्या सर्व लोकांची होती. आजची बैठक आमची उमेद वाढवायला महत्त्वाची आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार म्हणाले, आजची वर्कींग कमिटीची बैठक संविधानाला धरून होती. त्यामुळे कुणी काही म्हटले असेल तर त्यात कोणतीही खरी गोष्ट नाही. सर्वोच्च न्यायालयाचा जो निवाडा आला आहे त्यात विधिमंडळ सदस्यांची संख्या हा मेजर इश्यू नाही. मात्र कुणाला पंतप्रधान बनायचे तर कुणाला मुख्यमंत्री बनायचे आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवार यांची खिल्ली उडवली.
तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, आमचा विश्वास निवडणूक आयोगावर आहे. आम्हाला जे काही सांगायचे आहे ते निवडणूक आयोगाला सांगणार आहे. मात्र त्यांनी दखल घेतली नाही तर दुसऱ्या यंत्रणेकडे जाण्याचा विचार करु मात्र ही वेळ आमच्यावर येईल असे मला वाटत नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल असे सांगत ते पुढे म्हणाले, जिथे लोकांचे समर्थन आहे तिथे काय स्थिती असते हे मी पाहिले आहे आणि ज्याप्रकारे महाराष्ट्रात युवकांचे समर्थन मिळत आहे ते पहाता मला त्याचा आनंद आहे असेही सांगितले.