मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, केवळ राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. जर राज्यातील सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी केंद्र सरकारला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विधेयक आणायला सांगितले पाहिजे. जेणेकरून तातडीने मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
राज्य सरकारला जर मराठा समाजाला आरक्षण खरच द्यायचे असेल तर त्यांनी केंद्र सरकारला विशेष अधिवेशनामध्ये मराठा समाजाला १६% आरक्षणासंदर्भातील विधायक आणण्याचे म्हटले पाहिजे. परंतु राज्य सरकारकडून असं न करता केवळ मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. एका संदर्भात राज्य सरकार चालढकलीचे काम करत आहे. यांना कुणालाच आरक्षण द्यायचे नाही आहे असा आरोप करत मंडल आयोगाने कुणबी समाजाला आरक्षण दिले होते असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारकडून इंडिया शब्द इतिहास जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, जिव्ह आ इंडिया, चख दे इंडिया चालते पण तुम्हाला इंडिया शब्द चालत नाही यावरूनच समजते की केंद्र सरकार किती छोट्या मनाचे आहे. इंडिया आघाडीला देशभरात मिळत असलेल्या मोठ्या समर्थनामुळे केंद्रातील भाजपा च्या नेत्यांची पायाखालची जमीन हल्ली आहे. त्यामुळे त्यांनी इंडिया शब्द हा इतिहास जमा करण्याचे विधेयक विशेष अधिवेशनात आणणार असल्याची चर्चा केली जात आहे. पण जर मी भारत नावाने पार्टी बनवली तर काय करणार आहात तुम्ही. भारत हा कधी देश नव्हताच आणि इंडिया हा देश कधी नव्हताच जेव्हा बाबासाहेबानी संविधान दिले तेव्हा हा देश तयार झाला आणि इंडिया नाव देण्यात आले असे यावेळी स्पष्ट केले.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, देशातील मोदी सरकार ही एक कलमी कार्यक्रम राबवत आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय देखील मोदी सरकारने बदलले आहे. दिल्ली सरकारचा अधिकार काढून घेण्याचा निर्णय देखील केंद्र सरकारने अध्यादेश आणून काढून घेतला आहे भाजपाला सोयीचं असेल अशा प्रकारे केंद्रातील सत्तेचा वापर करण्यात येत आहे. भाजपाकडून देशाच्या संविधानाचे पाया उखडून टाकण्याचे काम करण्यात येत आहे असा आरोपही केला.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, देशाच्या सर्वोच्च इमारतीचे आणि संविधानाच्या मंदिराचे उद्घाटन कुणाच्या हस्ते झालं यावरून मनुवादी विचार दिसून येतात. संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्याकरिता आलेल्या त्या साधूंची नावे काय होती? हे नावे ऐकून प्राचीन युगात गेल्यासारखे वाटले होते. या संसद भवनाच्या उद्घाटना वेळी स्त्रियांबद्दल मनुस्मृती द्वेष दिसला आहे. मला हे मान्य नाही मला सर्वसमावेशक हिंदू धर्म आम्हाला मान्य आहे. पण सनातन हिंदू धर्म मान्य नाही असेही ठणकावून सांगितले.
एका खाजगी वृत्तवाहिनीने किरीट सोमय्या यांची बातमी लावली म्हणून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पण या व्हिडिओची चौकशी होणार होती त्याचं काय? झालं आहे. जे त्यांनी दाखवले त्याला त्यांनी दुजोरा दिला नाही. अशी बातमी लावणे म्हणून संपादक वर गुन्हा दाखल होतो हाच गुन्हा आहे. त्यांनी ही बातमी कुठून आणली आणि कशी आणली हा संविधानाने त्यांना दिलेला अधिकार आहे असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.