शिंदे गटाकडून ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात देऊन एकनाथ शिंदे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर भाजपा-शिंदे गटाच्या कार्यकर्ते-नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. आता या जाहिरात वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते शुक्रवारी १६ जून रोजी जळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, आमचा समज होता की, हे जे सरकार बनलं आहे त्यात मोठा वाटा किंवा मोठी संख्या भाजपाची आहे. मात्र, जाहिरातीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली की, भाजपाचे योगदान यात जास्त नाही. जास्त योगदान अन्य घटकांचं आहे आणि हे कळवण्याचं ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झालं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
देशभरातील भाजपाच्या निवडणुकीतील यशावर बोलताना शरद पवार म्हणाले, आज केरळमध्ये भाजपा नाही. शेजारी तामिळनाडूतही भाजपा नाही. कर्नाटकमध्ये आत्ता निवडणुका झाल्या, तेथेही भाजपा सत्तेत नाही. तेलंगणा, उडिशा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगालमध्येही भाजपा नाही. मग भाजपा आहे तरी कुठे. सध्या भाजपा उत्तर प्रदेश आहे कबुल करावं लागेल.
मध्य प्रदेशमध्ये भाजपा सत्तेत आहे, मात्र तिथं त्यांचं राज्य नव्हतं. तिथं कमलनाथ यांच्या नेतृत्वातील सरकार होतं. भाजपाने आमदार फोडून मध्य प्रदेशमधील सरकार पाडलं आणि सत्ता ताब्यात घेतली. गोव्यात काँग्रेसचं राज्य होतं, भाजपाने आमदार फोडले आणि सत्ताबदल केला. सध्या खोके हा शब्द अत्यंत लोकप्रिय झाला आहे. गोव्यातही त्यावेळी खोक्याचा कार्यक्रम झाला. नंतर तो महाराष्ट्रातही झाला आणि उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं, असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
या सगळ्यातून एकच चित्र दिसतं की, लोकांनी राज्यपातळीचे निर्णय घेताना भाजपाला बाजूला ठेवलं. ही लोकांची इच्छा असेल, तर देशपातळीवरही मतदारांच्या मनात यापेक्षा वेगळा विचार असेल, असं वाटत नाही. ही स्थिती असेल तर एकत्र बसून याचा विचार केला पाहिजे. लोकांची इच्छापूर्ती कशी होईल हा मुद्दा मी बैठकीत मांडणार आहे, असंही शरद पवारांनी नमूद केलं.
अमळनेर येथे पक्ष शिबीरानिमित्त उपस्थित असताना स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. दुर्दैवाने आमचा समज होता की राज्यात बनलेल्या सरकारमध्ये मोठा वाटा हा भाजपचा आहे. पण झालेल्या जाहिरातबाजीमुळे आमच्या ज्ञानात भर पडली. यामध्ये भाजपचे योगदान जास्त नसून अन्य घटकांचे योगदान आहे हे… pic.twitter.com/4RIuu3g4bi
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 16, 2023