Breaking News

सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, अजित पवारांसोबत सर्व जिल्हे फिरलो याचा अभिमान

अजित पवारांवर टिका करण्याची मोहीमच पैसे टाकून, पैसे देऊन सोशल मिडियाच्या माध्यमातून केली जात आहे. टिकाटिप्पणी करताना भान सोडून बोलत आहेत. दादांवर टिका करण्यासाठी काही पगारी माणसं ठेवली गेली आहेत. चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांना मी सन्मान देतो पण त्यापेक्षा खालच्या स्तरावरील जे पदाधिकारी आहेत ते एकेरी भाषेत दादांना बोलत आहेत. येत्या पुढच्या कालावधीत यापध्दतीने दादांच्या बाबतीत कुणी शब्दप्रयोग केला तर त्याला जशास तसे उत्तर देण्याचे काम करा असे थेट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी युवकांना केले.

सुनिल तटकरे यांनी सांगितले की, एका बाजूला यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचारांचा वारसा सांगायचा आणि दुसरीकडे अश्लाघ्य शब्दात टिकाटिपण्णी करायची याच पुण्यनगरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय अजितदादा पवार यांच्यामुळे उभे राहिले नाहीतर ते कधीच उभे राहिले नसते. केवळ आणि केवळ अजित पवार यांच्यामुळेच राष्ट्रवादीची कार्यालये उभी राहिली आहेत असे ठणकावून सांगतानाच ५३ पैकी ४३ आमदारांचे पाठबळ अजितदादांना का मिळाले. केवळ सत्तेसाठी नाही तर या आमदारांच्या पाठीशी सख्ख्या भावासारखी २५ वर्ष पाठराखण केली आहे. तरुण आमदार निवडून आणले. ही सगळी फळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालची आहे असेही स्पष्ट केले.

पक्षाला २५ वर्षे झाली. या वर्षात आपण सगळेच साक्षीदार आहोत. पण २५ वर्षाच्या इतिहासात ‘घड्याळ तेच वेळ नवी’ अशी बिरुदावली घेऊन पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील युवा शक्ती एकत्र आली त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी अभिनंदन केले.

ऐतिहासिक निर्णय अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला अनेक प्रश्न निर्माण करण्याचे काम झाले पण मला विश्वास वाटत होता की, गेली पस्तीस वर्षे अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात कणखरपणाची भूमिका बजावत पक्षाला ताकद देण्यासाठी झोकून देऊन काम करत होते त्यामुळेच अजित पवार तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहिला आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, लोकशाहीच्या माध्यमातून आणि बहुमताने आम्ही एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना महाराष्ट्राला विकसित करावे… अधिक प्रगतीपथावर न्यावे…युवकांचे, महिलांचे प्रश्न सोडवावे यासाठी सत्तेचा आधार घेत सत्तेसाठी नव्हे तर बहुजनांच्या व्यापक हितासाठी काम करावे हा क्रांतिकारी निर्णय अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतला गेला. त्यामुळे सहा महिन्यात झालेला बदल आपण बघत आहोत असेही सांगितले.

सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, कायद्याच्या कसोटीवर स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. काहीजण टिका करतात अदृश्य शक्तीचा हात पाठीमागे आहे. नैराश्यातून माणसाची मनं ज्यावेळी झपाटतात त्यावेळी कुणावर तरी दोष देण्याची परिस्थिती निर्माण होते असा टोलाही लगावला.

पुढे बोलताना सुनिल तटकरे म्हणाले की, २०१९ मध्ये भाजपासोबत जायचं ठरलं होतं परंतु शीर्षस्थ नेतृत्वाने निर्णय बदलला मात्र भाजपला दिलेला शब्द पाळण्यासाठी ‘शब्दाचा पक्का’ म्हणून ओळख असलेल्या अजित पवार यांनी ती शपथ घेतली व राजकीय सर्वस्व पणाला लावले असा गौप्यस्फोटही यावेळी केला.

सुनिल तटकरे म्हणाले की, अजित पवार यांनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयानंतर आता आपल्याला ही जबाबदारी घेऊन काम करायचे आहे असे सांगतानाच अजित पवार महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तुमच्यामुळे मी फिरू शकलो याचा अभिमान असल्याचे सांगितले.

आता महाराष्ट्राला मजबूत करण्यासाठी शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांच्या विचारांवर चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करण्यासाठी उभे राहायचे आहे. त्यासाठीच ही युवकांची शक्ती एकत्रित आली आहे. २५ हजारांची ही शक्ती एका हाकेसरशी अजित पवार यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. तुम्ही प्रत्येकजण शंभराजणांशी संपर्क केलात तर पंचवीस लाख युवकांपर्यत पोचू शकाल आणि पंचवीस लाखातील प्रत्येकाने चार युवकांशी संपर्क केलात तर महाराष्ट्रातील एक कोटी युवकांची ताकद अजितपर्व जे आपण नवीन पर्व घेऊन कामाला सुरुवात केली आहे त्याच्यापाठीमागे उभी राहिल. दाखवून देऊया या महाराष्ट्रात आता नवीन अजित पर्व सुरू झाले आहे ‘घड्याळ तेच वेळ नवी’ … त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत झोकून काम करुया असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारप्रमुख म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी युवा मिशन मेळाव्यात केली.

Check Also

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *